कोझिकोडे : आय लीगच्या येत्या मोसमासाठी गोकुळम केरळा एफसीने गोलरक्षक प्रशिक्षक म्हणून माजी गोलरक्षक मिहिर सावंत यांची नियुक्ती केली आहे.
‘फुटबॉल केरळवासियांच्या हृदयात वसलेले आहे, त्यामुळे या ठिकाणी येण्यात खूप आनंद होत आहे. मलाबारियन्ससाठी काम करण्याकरिता मला ही एक सर्वोत्तम संधीच मिळाली आहे, असे मला वाटते,’ असे मिहिर सावंत यांनी म्हटल्याचे क्लबच्या वेबसाईटवर देण्यात आले आहे. ‘मी संघाच्या सराव सत्रात याआधीच सामील झालो असून टेनिंगची प्रक्रिया अगदी उत्तम प्रकारे सुरू आहे. आम्ही उद्दिष्टे निश्चित केली असून आय लीग आणि आयएफए शील्ड जिंकणे हेच आमचे प्रमुख लक्ष्य असेल,’ असेही ते म्हणाले.
मिहिर सावंत हे एएफसी लेव्हल 3 चे परवानाधारक प्रशिक्षक असून ते आय लीगचे माजी गोलरक्षक आहेत. खेळाडू म्हणून त्यांनी धेंपो स्पोर्ट्स क्लब, वास्को एससी आणि मोहमेडन स्पोर्ट्स क्लबचे प्रतिनिधित्व केले हेते. 33 वर्षीय मिहिर सध्या पुणे येथे वास्तव्यास असून प्रशिक्षक या नात्याने त्यांनी जमेशदपूर एफसी (राखीव संघ), चर्चिल ब्रदर्स आणि फतेह हैदराबाद एफसी या क्लबसमवेत काम पाहिले आहे. आय लीगमधील ते सर्वात तरुण गोलरक्षक प्रशिक्षक आणि सर्वात तरुण लेव्हल 3 गोलरक्षण प्रशिक्षक परवानाधारक आहेत. ‘गोकुळम केरळा एफसीमध्ये मिहिर सावंत यांचे आम्ही स्वागत करतो. ते देशातील तरुण आणि अनुभवी गोलरक्षक प्रशिक्षक असून येत्या मोसमासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत,’ असे या क्लबचे सीईओ बी. अशोक कुमार म्हणाले. अलीकडेच या क्लबने घानाचा माजी राष्ट्रीय फुटबॉलपटू मोहम्मद आवाल याला येत्या मोसमासाठी करारबद्ध केले आहे. आय लीग स्पर्धा पुढील वर्षीच्या जानेवारी 9 पासून सुरू होणार आहे. आवालने घाना संघातून आफ्रिका नेशन्स कप स्पर्धेत भाग घेतला होता. याशिवाय विश्वचषक पात्रता संघातही त्याचा समावेश झाला होता. घानाच्या काही आंतरराष्ट्रीय मित्रत्वाच्या सामन्यांतही त्याने भाग घेतला होता.









