गृहमंत्र्यांच्या ’सौ’कडून महिला पोलिसांची विचारपूस : साताऱयातील अश्विनी घोरपडेंशी साधला संवाद
प्रतिनिधी/ सातारा
हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुर निवासस्थानातून बोलतोय, तुमच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ. आरतीताई देशमुख बोलणार आहेत. असे म्हणून फोन थेट मिसेस गृहमंत्री यांच्याकडे दिला जातो अन् समोरून आवाज येतो मी आरती देशमुख बोलतेय. समोरून बोलत असलेल्या महिला पोलिसाचा त्यावर विश्वासच बसत नाही. पण समोरून आईच्या मायेने विचारपूस झाल्यानंतर आरती देशमुखच बोलत असल्याची खात्री झाल्यानंतर त्या माहिला पोलिसांचा आनंद द्विगुणीत झाला.
हा प्रसंग महाराष्ट्रात सगळीकडे घडतोय तसा गुरूवारी साताऱयात घडला. आरती देशमुख या दररोज राज्यातील किमान पंधरा ते वीस महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱयांना फोन करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. करोनाचा संसर्ग वाढत असताना त्याची बाधा पोलिसांनाही झाली आहे. त्यामुळे पोलीस दलात काम करणाऱया कर्मचाऱयांचे मनोबल कमी होणार नाही याची काळजी आरती देशमुख घेत आहेत.
या लढाईत सातारा पोलीस अपवाद नसून गेली चार महिने सातत्याने रस्त्यावरची लढाई लढत आहेत. गुरूवारी दुपारी राज्याच्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनी सातारा पोलीस दलातील अश्विनी घोरपडे या महिला कर्मचाऱयाला फोन करून त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. तसेच कौटुंबिक अडीअडचणी समजून घेतल्या. घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहे आणि तुमच्यासारख्या धाडसी महिला पोलीस दलात असल्यानेच कोरोनाच्या लढाईत लॉकडाऊनची अमंलबजावणी काटेकोरपणे होत आहे.
आपला लवकरच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करून पोलीस दलाची मान अभिमानाने उंचावेल, असेच काम करण्याचा सल्ला दिला. सातायातील एकंदरीत परस्थिती व महिला पोलिसांना येत असलेल्या अडचणी जाणून घेताना देशमुख यांनी दाखवलेल्या आपुलकीने घोरपडे या भारावून गेल्या होत्या. आपल्याला गृहमंत्र्यांच्या पत्नी फोन करतील असे कधी मनात आले नव्हते. त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले.








