प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्ह्यात मिशन कवचकुंडल हे अभियान यशस्वी करण्यासाठी सप्तपदीचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानात जिल्ह्यातील 4 लाख 20 हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच यामध्ये चांगले काम करणाऱ्या प्राथमिक उपकेंद्र, आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय यांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. लसवंत गाव ही संकल्पनाही राबवण्यात येत आहे, असे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी सांगितले.
मिशन कवचकुंडल अंतर्गत सातारा जिल्ह्यात 18 वर्षावरील सर्व लोकांना कोव्हिड 19 चे मोफत लसीकरण सुरु करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने दि. 8 ते दि.14 अखेर मिशन कवचकुंडल मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला. पहिला डोस दिलेल्या लाभार्थीमध्ये होणारे मृत्यूचे प्रमाण हे 6.39 टक्के व दुसरा डोस दिलेल्या लाभार्थीमध्ये होणारे मृत्यूचे प्रमाण हे 0.99 टक्के आहे. शासनाने निर्धारित केल्यानुसार 18 वर्षावरील सर्व लाभार्थीचे 100 टक्के लसीकरण करण्याबाबत नियोजन केले आहे. त्यामध्ये शासनाने दि. 8 ते दि. 14 अखेर मिशन कवचकुंडल मोहिम आखली असून, त्यानुसार सातारा जिल्ह्यात मिशन कवच कुंडल मोहिम यशस्वी करण्यासाठी सप्तपदी निश्चित करण्यात आली आहे. याकरता जिल्हास्तरावर जिल्हा आरोंग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण हे सनियंत्रण अधिकारी म्हणून नोडल अधिकारी व तालुकास्तरावर तहसिलदार हे नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत. सलग 75 तास कोव्हिड लसीकरण देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाचे औचित्य साधून सलग 75 तास लसीकरण सुरु करण्यात आले आहे. यामध्ये कस्तुरबा रुग्णालय सातारा, उपजिल्हा रुग्णालय कराड, ग्रामीण रुग्णालय पाटण या ठिकाणी सुरु आहे. विक्रमी उद्दीष्ठ 4 लाख 20 हजार लसीकरण आहे. यामध्ये प्रत्येक गाव, वाडीवस्तीवर लसीकरण करण्यात येणार आहे. कोव्हिड लसीकरण आपल्या दारी, ज्या लाभार्थींना लसीकरण केंद्रावर येवून लस घेणे शक्य नाही त्यांना जागेवर जावून लसीकरण करण्यात येत आहे. महिलांचे 100 टक्के लसीकरण करण्याचे ध्येय आहे.