कोलकाता / वृत्तसंस्था
माजी वर्ल्ड चॅम्पियन मिराबाई चानू हिने मंगळवारी नवा वैयक्तिक उच्चांक नोंदवला. चानूने कोलकातात सुरु असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत एकूण 203 किलोग्रॅम वजन उचलत सुवर्णपदकाची कमाई केली. ती 49 किलोग्रॅम वजनगटातून प्रतिनिधीत्व करत आहे.
मूळ मणिपूरच्या असलेल्या 25 वर्षीय मिराबाईने स्नॅचमध्ये दुसऱया प्रयत्नात 87 किलोग्रॅम वजन उचलले तर क्लीन व जर्कमध्ये 115 किलोग्रॅम वजन उचलत एकत्रित 203 किलोग्रॅम वजनाचा उच्चांक नोंदवला. या कामगिरीमुळे नव्या विश्व मानांकन यादीत ती चौथ्या स्थानी झेपावली आहे. पहिल्या तीन स्थानी चीनची जियांग हुईहुआ (212 किलोग्रॅम), होऊ झिहुई (211 किलोग्रॅम) व कोरियाची री साँग गूम (209 किलोग्रॅम) अनुक्रमे विराजमान आहेत.
मिराबाईचा यापूर्वीचा वैयक्तिक उच्चांक 201 किलोग्रॅमचा होता. थायलंडमध्ये गतवर्षी संपन्न झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने ही कामगिरी साकारली होती. त्या स्पर्धेत ती चौथ्या स्थानी राहिली होती.









