प्रतिनिधी/ चिपळूण
दोन दिवसांपूर्वी कोसळलेल्या तुफान पावसामुळे चिपळूण-गुहागर मार्गावरील मिरजोळी-साखरवाडी येथे रस्त्यावरून वाहणाऱया चिखल-दगडयुक्त पाण्याच्या लोंढय़ामुळे तब्बल 25 दुचाकी या पाण्यात बंद पडल्या. तसेच एक दुचाकी घसरून महिलेसह दोघे जखमी झाले. यामुळे सर्वांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱयांसह ठेकेदाराच्या नावाने शिमगा केला.
मिरजोळी-साखरवाडी येथे गेल्या अनेक वर्षापासून गटारे व रस्त्यांना खड्डे पडण्याचे ग्रहण लागले आहे. दरवर्षी पावसाळय़ात लाईफकेअर हॉस्पिटल बायपास ते भगवती स्टील यादरम्यान पाऊस पडताच त्याचे पाणी थेट चिपळूण-गुहागर मार्गावर येते. यामुळे अनेकदा दुचाकी घसरून तसेच पाण्यात बंद पडून नुकसान होण्याचे प्रकार घडत आहेत. असे असतानाही राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व रस्त्याची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी असलेले मनीषा ऍण्ड राज कंपनीचे ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी येथील ग्रामस्थ रफीक साबळे यांनी उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर येथे थातूरमातूर उपाययोजना करण्यात आल्या. त्या किती तकलादू आहेत हे दोन दिवसांपूर्वी पडलेल्या काही तासांच्या जोरदार पावसाने दाखवून दिले.
हा पाऊस सायंकाळी पडला. त्यामुळे मिरजोळी, कोंढे, शिरळ, वैजी, भोम, मालघर, कालुस्ते आदी गावांतून मोठय़ाप्रमाणात शहरात कामाला येणाऱया नोकरदार तरूणांना याचा फटका बसला. गटारे नसल्याने पावसाचे पाणी मातीसह रस्त्यावर आले. त्यातच खड्डय़ामुळे अनेकांना अंदाज आला नाही. त्यामुळे घर गाठण्यासाठी या पाण्यातून दुचाकी न्याव्या लागल्या. यातूनच अर्धवट रस्त्यात तब्बल 25 दुचाकी बंद पडल्या, तर एका दुचाकीस्वाराला अंदाज न आल्याने तो पत्नीसह या पाण्यात पडला. त्याची दुचाकी वाहून जात होती. मात्र काही ग्रामस्थांनी या दोघांना बाहेर काढून दुचाकी पाण्याबाहेर ओढली. त्यामुळे अनर्थ टळला. दुचाकी बंद पडल्याने त्या दुरूस्त करण्यासाठी मोठा खर्च आला.
अशीच परिस्थिती मुंबई-गोवा महामार्गावर प्रांत कार्यालयाजवळ होती. येथेही अनेक दुचाकी पाण्यात फसल्या होत्या, तर महामार्गावरील वाहतूक व्यवस्थाही कोलमडली होती.