प्रतिनिधी / मिरज

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाविकास आघाडीने बाजी मारली. मिरज शहरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. महाराणा प्रताप चौकात पेढे वाटून विजयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
पुणे पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी एक लाख, 22 हजार 145 मते मिळवून विजय संपादन केला. अरुण लाड हे सांगली जिल्ह्यातील उमेदवार असल्याने निवडणुक प्रतिष्ठतेची बनली होती. गुरुवारी मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर अरुण लाड प्रथम पसंतीच्या मत क्रमांकावर आघाडीवर होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी केली होती.
शुक्रवारी सकाळी निवडणुकीचा अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महाराणा प्रताप चौकात जल्लोष केला. साखर, पेढे वाटून विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादीचे अभिजित हारगे, नगरसेविका संगीत हारगे, संजय मेंढे, करण जामदार, राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष राधिका हारगे, शिवसेनेचे संजय काटे, विशाल रजपूत यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.








