सहाजणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल
कुपवाड / प्रतिनिधी
मिरज एमआयडीसीतील मुख्य रस्त्यालगतच्या हॉटेल अशोका बियरबारमध्ये सोमवारी रात्री दारुच्या नशेत गुंडांच्या टोळक्याने हातात धारदार शस्त्र घेऊन चांगलाच राडा घातला. कोयत्याने हॉटेलची तोडफोड करून व्यवस्थापकावर जीवघेणा हल्ला करून जखमी केले. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली असून पोलिसांनी पंचनामा करून सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सहाजणांच्या टोळीतील पाच जणांनी कोयत्याने बारमधील टेबल, दारुच्या बाटल्या, खुर्च्या, साहित्य फोडून ५० हजार रुपयाचे नुकसान केले. तर एकाने हाॅटेलचे व्यवस्थापक नागनाथ निवृत्ती शिंदे (वय ३२,सध्या रा.ज्ञानगिरी वसाहत,सावळी. मूळ बनेवाडी ता.कवठेमहांकाळ) याच्या डोक्यात बाटली फोडून गंभीर जखमी केले आहे.याबाबतची फिर्याद व्यवस्थापक नागनाथ शिंदे यांनी पोलिसात दिली आहे.
दरम्यान, हॉटेलमध्ये हल्ला का झाला ? याबाबत नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, हल्ल्यानंतर सर्वजण पसार झाल्याने नावे समजू शकली नाहीत. त्यांचा शोध घेण्यासाठी कुपवाड पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. त्यांना लवकरच अटक करणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील यांनी सांगितले.