पोलिसाच्या नावावर आठ लाख कर्ज काढून परस्पर पैसे हडपले
प्रतिनिधी/मिरज
तुमच्या बँक खात्याची केवायसी पूर्ण करावयाची आहे, बँकेची माहिती आणि ओटीपी कोड सांगा, असे म्हणून एका भामटय़ाने पोलिसाच्या नावावर आठ लाखांचे कर्ज घेऊन साडेसात लाख रुपये ऑनलाईन हडप केल्याची घटना उघडकीस आली आहे. तानाजी बच्चाराम पसारे (वय ३५, रा. सावर्डे खुर्द, ता. कागल, जि. सोलापूर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नांव आहे. याबाबत महात्मा गांधी चौकी पोलिसात नोंद झाली आहे. फसवणूक झालेली व्यक्ती ही मिरज लोहमार्ग पोलिस ठाण्यात पोलिस नाईक पदावर कार्यरत असून, खुद्द पोलिसाचीच ऑनलाईन फसवणूक झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
तानाजी पसारे यांना 24 जानेवारी रोजी एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. सदर व्यक्तीने आपण स्टेट बँकेतून बोलत असून, तुमच्या बँक खात्याची केवायसी पूर्ण करावयाची असल्याचे सांगितले. त्यानुसार सदर अज्ञात व्यक्तीने तानाजी पसारे यांच्याकडून बँक खात्याची माहिती, आधार क्रमांक आणि मोबाईलवर पाठविलेला ओटीपी क्रमांक विचारुन घेतला.
त्यानंतर पसारे यांच्या नावावर आठ लाख रुपयांचे कर्ज घेउढन त्यातील सात लाख, 75 हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. प्रत्यक्षात मात्र पसारे यांनी कोणत्याही बँकेकडून कर्जच घेतले नव्हते. अज्ञात व्यक्तीने बँक खाते, आधार क्रमांकाचा गैरवापर करत ओटीपी क्रमाक विचारुन आपल्या नावावर परस्पर कर्ज घेऊन फसवणूक केल्याचे पसारे यांच्या लक्षात आले. त्यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात धांव घेऊन फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.