ऑनलाइन टीम / मिरज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरजेत चिमुकल्यांनी घरी राहून बाबासाहेबांना अभिवादन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरी राहूनच जयंती साजरी करण्याचा संदेश या चिमुकल्यांनी आपल्या कृतीतून दिला.
आज १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती. दरवर्षी ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. मिरजेत त्यानिमित्त मोठी मिरवणूक असते. प्रमुख चौकात स्वागत कमानी उभारल्या जातात. ही मिरवणूक पाहण्यासाठी पंचक्रोशीतून आंबेडकर अनुयायी येतात.
यंदा मात्र, कोरोनाच्या संकटामुळे डॉ. आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. घरात राहूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्याचे आवाहन केले होते. मिरजेत काही चिमुकल्यांनी घरात राहून डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. भारतनगर भागात शांतीसागर सोसायटीजवळ राहणाऱ्या पार्थ विवेक भडकंबकर याने घरातच असणाऱ्या बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत त्यांना अभिवादन केले. हर्ष हा सामाजिक कार्यकर्ते विवेक भडकंबकर यांचा मुलगा आहे. तो केंब्रीज स्कूलमध्ये दुसरीत शिकतो.
मिरजेतील गार्गी काटकर आणि मैत्रेयी काटकर या चिमुकल्या तर भगिनींनी आंबेडकर चरित्राचे वाचन करीत बाबासाहेबांना अनोखी आदरांजली वाहिली. प्रा. गौतम काटकर यांच्या या दोघी कन्यांनी बाबासाहेंबाच्या जयंतीचा खरा अर्थ आपल्या कृतीतून सांगितला. आरग येथील विराज विकास कांबळे आणि संघराज सतीश कांबळे या दोघा चिमुकल्यांनी घरी राहून बाबासाहेबांना अभिवादन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिमुकल्यांनी वेगळ्या पध्दतीने साजरी केलेली डॉ. आंबेडकर यांची जयंती कौतुकास्पद आहे. घरी राहूनही बाबासाहेबांना अभिप्रेत असणारे विचार अंगीकारता येतात, असा संदेशच जणू या चिमुकल्यांनी सर्वांना दिला आहे.