नऊ दिवसांच्या दुर्गोत्सवाची सांगता, अंबाबाईची पालखी मिरवणूक
प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरात गेली नऊ दिवस सुरू असलेला दुर्गोत्सवाची शुक्रवारी उधं गं आई उधं च्या गजरात विसर्जन मिरवणुकीने सांगता झाली. मिरज शहर, उपनगर आणि ग्रामीण भागातील 168 मंडळांच्या दुर्गामाता मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवाप्रमाणे या मिरवणूकाही मुख्य मार्गावरून काढण्यात आल्या. ग्रामदेवता अंबाबाईची पालखी मिरवणूक साध्या पध्दतीने काढण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जल्लोषी विसर्जन मिरवणूक काढण्यास निर्बंध असल्याने सर्वच मंडळांनी साध्या पध्दतीने विसर्जन केले.
शहरात 54, उपनगरात 18 आणि मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागात यंदा 96 अशा 168 सार्वजनिक मंडळांनी दुर्गामातेची प्रतिष्ठापना केली होती. गेली नऊ दिवस अध्यात्मिक, धार्मीक कार्यक्रम घेण्यात आले. शुक्रवारी दसऱ्या दिवशी मिरवणुका काढून दुर्गामातेच्या मुर्तींचे विसर्जन झाले. मिरवणूकीत महिला आणि मुलींची संख्या लक्षणीय होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.