डॉ. त्रिंबक शिरवळकर यांनी लिहिलं पुस्तक, लसकरणाची इत्यंभूत माहिती
मानसिंगराव कुमठेकर/मिरज
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सध्या प्रशासनाच्यावतीने मोहीम उघडण्यात आली आहे. त्यामुळे या लसीकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र, 140 वर्षांपूर्वी मिरजेत लसीकरणाची संपूर्ण माहिती देणारे मराठी भाषेतील पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले. तत्कालीन मिरज संस्थानच्या सरकारी दवाखान्यातील डॉ. त्रिंबक शिरवलकर यांनी सन 1879 मध्ये हे पुस्तक लिहिले. यामध्ये देवीचा आजार आणि त्यावर करण्यात येणारे लसीकरण याची सचित्र माहिती दिली आहे. लसीकरण प्रक्रियेविषयी लिहिण्यात आलेलं हे मराठी भाषेतलं पहिलं पुस्तक ठरलं. या पुस्तकामुळे तत्कालीन नागरिकांत लसणीकरणाबाबत असलेल्या गैरसमजूती दूर होण्यास मदत होऊन लसीकरणासाठी लोक धैर्याने पुढे येऊ लागले.
सध्या कोरोना लसीची चर्चा
गेली वर्षभर संपूर्ण जगात कोरोनाच्या आजाराने थैमान मांडले होते. या आजाराने अनेकांचे बळी गेले. या आजारावर कोणतेही प्रतिबंधात्मक औषध अद्याप तयार झाले नाही. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ या आजारावर औषध शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. वेगवेगळ्या देशांनी कोरोना प्रतिबंधक लस शोधण्याकडे लक्ष दिले. भारतातील शास्त्रज्ञांना या कामी यश आले आणि कोरोना प्रतिबंधक लस तयार झाली. ही लस देण्याचे काम सध्या देशभर सुरू आहे. यासाठी प्रशासनाच्या वतीने मोठी मोहीम उघडली आहे. देशातील सर्व नागरिकांना वेगवेगळ्या टप्प्यात लस दिली जात आहे. त्यामुळे या लसीकरणाची चर्चा सध्या देशभर सुरू आहे.
लसीकरण माहितीचे पहिले मराठी पुस्तक
सध्या लसीकरणाबाबत ही चर्चा सुरू असली तरी, सुमारे 140 वर्षांपूर्वी मिरज शहरात अशाच पद्धतीच्या लसीकरणाबाबत एक पुस्तक तत्कालीन मिरज संस्थानच्या सरकारी दवाखान्याचे डॉ. त्रिंबक सखाराम शिरवलकर यांनी प्रसिद्ध केले होते. लसीकरणावर इत्यंभूत माहिती देणारे ते मराठी भाषेतले पहिले पुस्तक ठरले. सन 1879 मध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकात डॉ. शिरवळकर यांनी देवीचा रोग आणि त्यावर करण्यात येणाऱया उपाययोजना तसेच देवी प्रतिबंधक लस याची माहिती दिली आहे. मराठी भाषेत लसीकरणाची माहिती दिल्यामुळे त्या वेळी लोकांच्या मनात असलेले लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर होण्यास मदत झाली.
डॉ. शिरवलकर मिरजेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी
डॉक्टर त्रिबंक शिरवलकर हे ग्रँट मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाले होते. ग्रँड मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय परीक्षांमध्ये त्यांनी विशेष नैपुण्य मिळवले होते. त्यांची नियुक्ती मिरज संस्थानच्या सरकारी दवाखान्यात प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून झाली. सन 1875 ते अठराशे 1885 या काळात ते मिरज संस्थानचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी होते. याच काळात देशभर देवीच्या आजाराने थैमान घातले होते. लहान मुलांना देवी येऊन त्यामध्ये त्यांचा मृत्यू होत असे. देवी रोगावर फारसे वैद्यकीय उपचार त्या वेळी उपलब्ध नव्हते. त्यामुळे देशभरात बालमृत्यूचे प्रमाण वाढले होते. या काळात ब्रिटिश सरकारने देवी रोगावरील लस लहान मुलांना देण्यासाठी जागोजागी व्हॅक्सिनेटर म्हणजेच लसतज्ञ नेमले होते. ब्रिटिश सरकारने यासाठी लसीकरणाचा कायदाही केला होता.
असे झाले पुस्तक तयार
ब्रिटिश सरकारने लहान मुलांमध्ये होणाया देवीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण बंधनकारक केले होते. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील संस्थानिकांनी आपापल्या कार्यक्षेत्रात लसीकरणासाठी तज्ञ व्यक्ती नेमल्या. कुरुंदवाड संस्थानिकांनी काही व्यक्तींना लसीकरणाचे प्रशिक्षण घेण्यासाठी मिरजेतील सरकारी दवाखान्यात पाठवले. या दवाखान्यात प्रमुख वैद्यकीय अधिकारी असणाऱया डॉक्टर त्रिंबक शिरवळकर यांनी या व्यक्तीना लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यासाठी काही टिपणे काढली होती. हीच टिपणे संपूर्ण सर्वांनाच उपयोगी ठरतील असे विचार करून डॉक्टर शिरवळकर यांनी या टिपणांमध्ये भर घालून हा ग्रंथ तयार केला. हा ग्रंथ डॉक्टर शिरवळकर यांनी मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल यांना अर्पण केला आहे. लसीकरणावर इत्यंभूत माहिती देणारे हे मराठी भाषेतले पहिले पुस्तक ठरले. त्यावेळी लसीकरणाबाबत गैरसमज नागरिकांमध्ये होते हे गैरसमज दूर करण्याचे काम या मराठी पुस्तकाने केले. त्यामुळे नागरिक आपल्या मुलांना लस देण्यास तयार होऊ लागले. डॉ. शिरवलकर यांच्या या कामगिरीचे कौतुक तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि मिरज संस्थाननेही केले.
काय आहे या पुस्तकात
लसीकरणावरचा हा ग्रंथ तीन भागात असून प्रारंभी देवी रोगाची उत्पत्ती आणि त्याची माहिती दिली आहे. देवी रोगाचे परिणाम व त्यावर कोणत्या उपाययोजना करायच्या याची माहिती या पहिल्या भागात आहे. दुसऱया भागात देवी काढणे म्हणजे काय? देवीची लस कशी घ्यायची? याची इत्यंभूत माहिती दिली आहे. देवीच्या लसीकरणाचे सचित्र वर्णन त्यांनी या भागात केले आहे. तिसऱया भागात लसीकरणाबाबत त्यावेळी करण्यात आलेल्या कायद्यांची माहिती देण्यात आली आहे. लसीकरणासाठी कोणती साधने वापरायची, त्यांची देखभाल कशी करायची?लस दिल्यानंतर कोणती काळजी घ्यायची? याबाबत सविस्तर विवेचन केले आहे. लसीकरणाचा तत्कालीन संख्यात्मक तक्ताही त्यांनी या पुस्तकात दिला आहे. देवीचा रोगाने मिरज शहर आणि परिसरात किती विद्यार्थ्यांचा अथवा लहान मुलांचा बळी गेला? कोणत्या शाळेतील किती मुले देवी आजाराने ग्रस्त आहेत? याची आकडेवारी डॉ. शिरवलकर यांच्या या पुस्तकात आहे.








