भाजपा बंडखोर-महाआघाडीच्या बळावर काँग्रेसचे अनिल आमटवणे उपसभापती
प्रतिनिधी / मिरज
मिरज पंचायत समितीत अखेर सत्ताधारी भाजपाला बुधवारी खिंडार पडले. बंडखोर भाजपा सदस्य आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठींब्यावर काँग्रेसचे अनिल आमटवणे उपसभापती पदासाठी अटीतटीच्या लढतीत विजयी झाले. त्यांनी भाजपा उमेदवार किरण बंडगर यांचा 11 विरुध्द दहा मतांनी पराभव केला. पराभवामुळे आमदार सुरेशभाऊ खाडे गटाला मोठा धक्का बसला. या निवडीचे जिल्हाभर पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे पडसाद उपसभापती निवडीवर उमटण्याची शक्यता बळावली होती. मालगांवच्या सदस्या शुभांगी सावंत आणि आरगच्या सदस्या सुनिता पाटील यांनी नाराजी व्यक्त करत उघडपणे विरोध करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे महाआघाडीच्या वतीने अनिल आमटवणे किंवा सतिश कोरे यांना उपसभापतीसाठी निश्चित करुन प्रयत्न सुरू होते.
आमदार सुरेशभाऊ खाडेंसह भाजपा नेत्यांना सावंत आणि पाटील यांची नाराजी नाहीशी करण्यात शेवटपर्यंत यश आले नाही. या नाराज सदस्यांच्या ग्रामपंचायत पातळीवरच्या काही अटी मान्य करणे नेत्यांना शक्य न झाल्याने आज त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अत्यंत अटीतटीच्या लढतीनंतर अनिल आमटवणे उपसभापती पदावर विराजमान झाले.