प्रतिनिधी/मिरज
कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दौऱयावर असलेल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मिरज कोविड सेंटरला धावती भेट दिली. अवघ्या दहा मिनिटात त्यांनी कोरोना रुग्णालयातील कामकाजाचा आढावा घेऊन अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांना काही सुचना दिल्या. कोणत्याही परिस्थितीत रुग्णांची हेळसांड होऊ नये, यासाठी रुग्णालय प्रशासनाने सर्व उपाययोजना कराव्यात, प्रसंगी बेडची संख्या वाढवावी, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान, त्यांनी सांगली-मिरज रस्त्यावर नव्याने उभारलेल्या सिनर्जी मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटललाही भेट दिली.
सिनर्जी हॉस्पिटलमध्ये डॉ. रविंद्र आरळी यांनी फडणवीस यांचे स्वागत केले. यावेळी रुग्णालयातील विविध विभागांना भेटी देऊन वैद्यकीय नगरी मिरज शहरात सिनर्जीमुळे मोठी भर पडली असून, रुग्णालयातील कोविड सेंटर महत्त्वाची भुमिका बजावले. राज्यात जिह्याचा मृत्यूदर वाढला असून, संयुक्तिकपणे प्रयत्नशील राहून, प्रथम मृत्यूदर कमी करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयात सुविधा वाढविण्यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरावा करु. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी एकजुटीने लढा द्यावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले. यावेळी त्यांच्या समवेत खासदार संजयकाका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, निताताई केळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, शेखर इनामदार, माजी महापौर संगीता खोत, नगरसेवक निरंजन आवटी यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.