मिरज सुधार समितीचा आरोप, नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार
प्रतिनिधी / मिरज
मिरज आणि कुपवाड शहरासाठी अतिरिक्त आयुक्त म्हणून दत्तात्रय लांघी महापालिका सेवेत रुजू झाले आहेत. मात्र, त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचे कोणतेच अधिकार आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले नाहीत. त्यामुळे मिरज-कुपवाडला मिळालेले अतिरिक्त आयुक्त केवळ नामधारी असल्याचा आरोप करीत मिरज सुधार समितीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.
अतिरिक्त आयुक्त लांघी यांच्याकडे मिरज आणि कुपवाड शहराचा पदभार दिला आहे. मात्र त्यांना कारवाई किंवा विकासात्मक आर्थिक धोरणाचे कोणतेच अधिकार नसल्याने आयुक्त नितीन कापडणीसांच्या मनमानी कारभारामुळे अतिरिक्त आयुक्त पद नामधारी शोभेचे पद बनले आहे, असा आरोप मिरज सुधार समितीने केला आहे.








