फेडरेशन अध्यक्ष वीरेंद्र जैन यांची माहिती
देशातील मिठाई आणि फरसाण उद्योगाने एक लाख कोटी रुपयांच्या उलाढालीचा विक्रम रचला असल्याची माहिती फेडरेशन ऑफ स्वीट अँड नमकीन मॅन्युपॅक्टरर्सचे (एफएसएनएम) अध्यक्ष वीरेंद्र जैन यांनी दिली. या उद्योगाने वृद्धी नोंदविली असून, या वर्षाच्या उलाढालीचा विक्रम 1 लाख कोटी रुपयांच्यावर पार केला आहे, असेही ते म्हणाले.
एफएसएनएम या महिन्याच्या 9 आणि 10 तारखेला ऑल्मंड हाऊसबरोबर हैदराबादच्या मधापूर येथे तिसरे ‘जागतिक मिठाई नमकीन अधिवेशन’ आयोजित करणार आहे. जीएसटीतील विविध स्लॅब, अन्न सुरक्षा आणि इतर बऱयाच गुंतागुंतीमुळे हा उद्योग आपले चांगले प्रदर्शन करू शकला नाही, असे असोसिएशनचे संचालक फिरोज एच. नकवी यांनी सांगितले.
एक कोटींपेक्षा अधिक लोकांना रोजगार
या उद्योगातून एक कोटीपेक्षा अधिक लोकांना प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध केला जातो. हा उद्योग पीठ, बेसन, साखर, तूप, तेल आणि मसाले यासारख्या कच्च्या मालाचा सर्वाधिक खरेदीदार आहे. हल्दीराम, बिकानो, बिकाजी सारख्या काही मोठय़ा कंपन्यांनी देशातच नव्हे तर विदेशातही आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. देशात 300 प्रकारची मिठाई आणि फरसाणाची विक्री केली जाते.








