कुटबण जेटीवर तयारी जोरात, केवळ 40 टक्के कामगार दाखल
प्रतिनिधी/ कुंकळ्ळी
राज्यातील मासेमारीवरील बंदी संपुष्टात येऊन आज 1 पासून मासेमारीचा नवीन मोसम सुरू होत आहे. त्यादृष्टीने दक्षिण गोव्यातील मुख्य जेटी असलेल्या कुटबण येथील बोटमालक तयारीला लागले आहेत. मात्र समुद्र अद्याप अपेक्षित प्रमाणात शांत न झाल्याने मोसम सुरू झाला, तरी आज फारसे ट्रॉलर पाण्यात उतरण्याची शक्मयता कमीच आहे असे या जेटीला भेट दिली असता जाणवले.
साळ नदीच्या मुखाशी वाळू खाली उतरून येत असल्याने तसेच समुद्र अद्याप खवळलेला असल्याने फारशा ट्रॉलर्सना मासेमारीसाठी जाता येणार नाही. कारण अशा परिस्थितीत समुद्रात गेल्यास त्यांना परतताना खूप त्रास होतात आणि त्याभरात ट्रॉलर वाळूमध्ये रूतण्याची किंवा दगडावर आदळून फुटण्याची शक्मयता असते. यापूर्वी अशा प्रकारे ट्रॉलर फुटण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. त्यामुळे ट्रॉलरमालकांनी सावध पवित्रा सध्या घेतलेला आहे.
बहुतांश कामगार येणे बाकी
शनिवारी कुटुंबण जेटीला भेट दिली असता तेथे मासेमारीवर रवाना होण्याच्या दृष्टीने तयारी चालल्याचे दिसून आले. ट्रॉलर्सवर जाळी चढविण्याचे तसेच बर्फ भरण्याचे काम चालू होते. येथील ट्रॉलर्सवर काम करणारे बहुतेक सारे कामगार हे परप्रांतीय आहेत. सध्या सुमारे 40 टक्के कामगार परत आले असून बहुतांश कामगार अद्याप परतायचे आहेत असे यावेळी दिसून आले.
मच्छीमारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्याच्या परिस्थितीत आज रविवारी अवघे काही मोठे ट्रॉलर्स मासेमारीसाठी जाण्याची शक्मयता असून बाकीच्या बहुतेक ट्रॉलर्सना जेटीवरच राहावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत. रविवारी पहाटे 5 पासून ओहोटी सुरू होणार असून ती सकाळी 10 वा. समाप्त होणार आहे. त्यानंतर भरती सुरू होणार असून त्यावेळी मोठे ट्रॉलर्स रवाना होण्याची शक्यता आहे.
सोलार कोळंबी, बांगडे मिळण्याची शक्यता
सहसा मासेमारी मोसमाच्या सुरुवातीला सोलार कोळंबी जाळय़ात मोठय़ा प्रमाणात मिळत असते आणि त्यावरच मच्छीमारांचा डोळा असतो. यंदाही अशी कोळंबी मोठय़ा प्रमाणात मिळण्याची अपेक्षा मच्छीमारांना आहे. त्याचबरोबर मागील दोन-तीन वर्षांत बांगडे मोठय़ा प्रमाणात मिळालेले नाहीत. मात्र अलीकडच्या काळात पारंपरिक मच्छीमारांना ज्या प्रकारे मासळी गवसलेली आहे ते पाहता यंदा बांगडे मोठय़ा प्रमाणात गवसण्याची शक्मयता कुटबण बोटमालक संघटनेचे अध्यक्ष विनय तारी यांनी व्यक्त केली.
दरम्यान, मासळीचे दर ठरविण्याचे काम आता बोटमालक संघटनेकडून होत नसल्याने दरांवर नियंत्रण राहिले नसल्याची माहिती संघटनेतील सूत्रांकडून देण्यात आली आहे. सध्या बोटमालकांमध्ये फूट पडून तीन गट निर्माण झालेले आहेत आणि काही एजंटांनी परस्पर ट्रॉलरमालकांशी संधान साधून आपल्याला हवे तसे दर आकारण्याचे प्रकार या ठिकाणी मागील दोन-तीन वर्षांपासून सुरू झालेले आहेत, अशी माहिती याप्रसंगी मिळाली.









