ऑनलाईन टीम / तरुण भारत
महाराष्ट्रातील राजकारणात नेते मंडळी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत असुन आरोप – प्रत्यारोपांची ही मालिका अद्याप संपलेली नाही. गेले काही दिवस भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आरोप करत याबाबतची कागदपत्रे ही सादर केली आहेत. यामुळे राज्यातील अनेक नेत्यांनी अब्रुनुकसानीचा दावा ही ठोकला आहे. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांनीही शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत खळबळजनक आरोप केले आहेत. यात आता राष्ट्रीय काँग्रेसने ही आरोपांच्या मालिकेत उडी घेतली आहे. याबाबत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबधीत एक व्हिडीओ ट्वीट केला असून यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.
ट्वीट केलेला व्हिडीओ भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या मुलीच्या लग्नातील असुन या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असणारे लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासोबत हस्तांदोलन करत असल्याचं दिसत आहे. प्रसाद पुरोहित आल्याचं दिसल्यानंतर फडणवीस जागेवरुन उभं राहून त्यांना हस्तांदोलन करत नमस्कार करतात. याबाबत सचिन सावंत यांचं म्हणणं की, “हा एक युएपीएचा आरोपी आहे. अत्यंत गंभीर घटनेत सहभागी असलेल्या आरोपीसोबत इतकी घनिष्टता असल्याचं दिसत आहे. यांच्यात खूपच मैत्री असल्याचं दिसत आहे” असे ते यावेळी म्हणाले आहेत.
या व्हिडीओबाबत प्रसाद लाड म्हणाले की, “माझ्या मुलीच्या लग्नात सचिन सावंत आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. अशाप्रकारे लग्नसोहळ्यात विकृतीची बुद्धी दाखवण्याचं काम काँग्रेसने केलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कर्नल पुरोहित मित्र म्हणून मी त्यांना बोलावलं होतं. पण अशा प्रकारे लग्नात कोण येतं त्यांचे फोटो, व्हिडीओ काढणं ही विकृती असल्याचे ते यावेळी म्हणाले. त्यामुळे यावर फडणवीस काय भुमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.