आठ जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात
चार जणांना होमक्वारंटाईन
श्रीवर्धनच्या माशांच्या गाडय़ाही मालवणात
प्रतिनिधी / मालवण:
पोलीस अधिकाऱयांची परवानगी घेऊन मालवण शहरात दाखल होणाऱया परजिल्हय़ातील व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बुधवारी सकाळी तर थेट रायगड जिल्हय़ातील श्रीवर्धन येथून माशांच्या गाडय़ा कुंभारमाठ या ठिकाणी आल्या होत्या. तारकर्ली व शासकीय विश्रामगृह येथील विलगीकरण कक्षांची क्षमता पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन दिवसात तब्बल बाराजण विविध ठिकाणाहून मालवणात दाखल झाले होते. दरम्यान, सर्वांची आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात आठजणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात तर चारजणांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.
मालवण तहसीलदार अजय पाटणे व पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी या बाबत सर्व प्रशासकीय यंत्रणेला दक्षतेने कार्यरत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. यामुळे गावागावात दाखल होणाऱया परजिल्हय़ातील व्यक्तींबाबत तात्काळ माहिती प्रशासकीय यंत्रणेकडे उपलब्ध होत आहे. मालवणातील पोलीस पाटील वासुदेव गावकर व पांडुरंग चव्हाण हे पोलिसांच्या साथीसाठी सहकार्याच्या भूमिकेतून काम करत आहेत.
मंगळवारी रात्री आले सातजण
वसई मुंबई येथून एका गाडीतून तब्बल सातजण त्रिंबकमध्ये जाण्यासाठी आले होते. सदरच्या गाडीच्या पासची चौकशी केली असता चालक आणि दोन व्यक्ती अशा तिघांना प्रवास करण्याची परवानगी होती. मात्र, त्या गाडीमध्ये सात व्यक्ती बसून थेट मालवणपर्यंत आल्या होत्या. यामध्ये एक शासकीय कर्मचारी असल्याने सदरची गाडी मालवणपर्यंत आल्याचे बोलले जात होते. तरीही मालवण पोलिसांनी थेट सदरची गाडी ग्रामीण रुग्णालयात नेली. त्याठिकाणी सर्वांची आरोग्य तपासणी होऊन त्यांची रवानगी तारकर्ली येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात करण्यात आली आहे. गोव्यातून मालवणात आलेल्या युवकाची आरोग्य तपासणी करून त्याची रवानगी संस्थात्मक विलगीकरणसाठी तारकर्ली येथे करण्यात आली आहे.
प्राध्यापक अन् अधिकारी दाखल
एका कॉलेजचे प्राध्यापक आपल्या पत्नी व मुलांसमवेत मालवणात दाखल झाले. तसेच एका शासकीय विभागातील एक अधिकारीही नोकरीसाठी हजर होण्यासाठी परजिल्हय़ातून दाखल झाला. दोन्ही व्यक्ती परजिल्हय़ातून दाखल झाल्याने त्यांना होमक्वारंटाईन करण्यात आले. त्यांच्यावर शिक्के मारून पुढील चौदा दिवस घरातून बाहेर न पडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
श्रीवर्धनच्या माशांच्या गाडय़ा मालवणात
रायगड जिल्हय़ातील श्रीवर्धन येथील माशांच्या दोन गाडय़ा बुधवारी कुंभारमाठ गावात दिसून आल्याने ग्राम दक्षता पथकाने सदरच्या गाडय़ा पोलिसांच्या ताब्यात दिल्या. या गाडय़ातील चालकांच्या हातावर शिक्के असल्याने ग्राम दक्षता पथकाने याबाबत नाराजी व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली. कुंभारमाठ येथे परजिल्हय़ातील माशांच्या गाडय़ा आल्याची माहिती मिळताच ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष तथा सरपंच प्रमोद भोगावकर, माजी सभापती मधुकर चव्हाण, पोलीस पाटील बावकर हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान, सदरच्या गाडय़ांना श्रीवर्धन ते सावंतवाडी असा प्रवास करण्याचा परवाना असल्याची पोलीस तपासात उघड झाले. तसेच त्यांच्या हातावर मारण्यात आलेले शिक्के हे हायवेवरून प्रवास करणाऱया गाडय़ांच्या चालकांवर मारण्यात येत असल्याचीही माहिती तपासात पुढे आली आहे. या गाडय़ांना परवानगी असल्याने त्यांची चौकशी करून सदरच्या गाडय़ा सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले.
गाडय़ांवर कारवाई होणे आवश्यक – मधुकर चव्हाण
कुंभारमाठ गावात आलेल्या माशांच्या गाडय़ा रायगड आणि रत्नागिरी जिल्हय़ातून मालवणात आल्या होत्या. यामुळे अशा गाडय़ांतून धोका अधिक संभवू शकतो. यामुळे या गाडय़ा कुंभारमाठ याठिकाणी का आल्या? कोणी आणल्या? याची चौकशी करण्यात येऊन संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे. सदरच्या गाडय़ा पकडण्यात आल्यानंतर काही मालवणातील स्थानिक मंडळी गाडय़ा सोडण्यासाठी हातापाया पडत होती, तसेच तीच मंडळी राजकीय पदाधिकारी यांच्यासमवेत गाडय़ांवर कारवाई टाळण्यासाठी प्रयत्नशिल होती, असेही माजी सभापती मधुकर चव्हाण यांनी सांगितले.









