अन्यथा रस्त्यावर येऊ : तळपणच्या मच्छीमारांचा बैठकीत इशारा, पोलीस-मत्स्योद्योग खात्याने दखल न घेतल्याबद्दल निषेध

प्रतिनिधी /काणकोण
मालपे, कर्नाटकातील ज्या बोटी तळपण किनाऱयानजीक येऊन बेकायदेशीररीत्या मासेमारी करतात त्यांच्यावर आठ दिवसांच्या आंत कारवाई केली नाही, तर रस्त्यावर येण्याचा इशारा तळपण-पैंगीण येथील किनाऱयावर घेतलेल्या मच्छीमार बांधवांच्या बैठकीत देण्यात आला. 25 रोजी मालपे, कर्नाटकातील मच्छीमारांना पिटाळून लावायला गेलेल्या तळपण येथील मच्छीमारांवर दगडफेक करण्याचा आणि शिशाचे गोळे फेकण्याचा प्रकार घडला होता. या घटनेला आठ दिवस झाले, तरी साधी नोंद काणकोणच्या पोलीस स्थानकावर झालेली नाही किंवा मत्स्योद्योग खात्याने स्थानिक मच्छीमारबांधवांची साधी विचारपूस केलेली नाही याचा यावेळी निषेध करण्यात आला.
या बैठकीला उपसभापती इजिदोर फर्नांडिस उपस्थित होते. या घटनेचा आपण निषेध करतो आणि सरकारच्या वतीने माफी मागतो. त्याचप्रमाणे आपण, कारवारचे आमदार, मत्स्योद्योग संचालक, स्थानिक मच्छीमार अशी मुख्यमंत्र्यांसमवेत संयुक्त बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले. तळपण किनाऱयावरील मच्छीमार बांधवांसाठी आपण नेहमीच धावून आलेलो आहे. येथील संरक्षक भिंत, गणपती मंदिर उभारणीसाठी आपण प्रयत्न केलेले असून यापुढे देखील ज्या ज्या वेळी मच्छीमार बांधवांवर अन्याय होईल तेव्हा आपण धावून येईन, असे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला काणकोण, बेतूल, माजाळी भागांतील पागी, गाबित समाजबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
प्रशासन लोकांच्या दारी हा उपक्रम राबविणाऱया सरकारने मच्छीमार बांधवांना न्याय दिला नाही, तर काय करायचे ते काँग्रेस प्रक्ष बरोबर जाणून असल्याचा इशारा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन भंडारी, काणकोण गट काँग्रेसचे अध्यक्ष प्रलय भगत यांनी दिला. तर मच्छीमार बांधवांच्या सहनशीलतेचा अंत होण्याची वाट पाहू नका, असे मत अखिल गोवा क्षत्रिय पागी समाजाचे अध्यक्ष अशोक धुरी, माजी नगराध्यक्ष रत्नाकर धुरी, दिवाकर पागी, लोलयेचे पंच ऍड. अनुप कुडतरकर, पैंगीणचे पंच रूदेश नमशीकर यांनी व्यक्त केले.
सागरी पोलिसांकडे आवश्यक सामग्री नाही
तळपण किनाऱयावर तैनात केलेल्या सागरी पोलिसांकडे समुद्रात घडणाऱया घडामोडींकडे लक्ष द्यायला सुरक्षित बोट तसेच अन्य सामग्री नाही, बोट असल्यास चालक नाही अशी परिस्थिती आहे. या विभागाने व्यवस्थित लक्ष दिले नाही, तर या ठिकाणी घुसखोरी होण्याची शक्यता आहे. हे असेच चालू राहिल्यास रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा अ. भा. मच्छीमार संघटनेच्या वेलांसियो सिमोईश यांनी दिला. कारवार बंदरावर मालपे, कर्नाटकातील मासेमारी करणाऱया बोटी बेकायदेशीरपणे येतात. या बोटींची क्षमता अधिक आहे. त्यामुळे साधी बोट वर्षाला जेवढी मासळी पकडते तेवढी मासळी या जादा क्षमतेच्या बोटी एकाच दिवसात पकडतात, अशी माहिती देऊन कारवार बंदरावर या बोटींना आसरा देऊ नये आणि गोवा सरकारने यासंबंधी कृती करायला हवी, असे मत माजाळी येथील मच्छीमारबांधव रमेश मेथा यांनी व्यक्त केले. गोव्यात जर मच्छीमारबांधवांनी आंदोलन केले, तर त्यांना माजाळी येथील मच्छीमारांचा संपूर्ण पाठिंबा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. कामिल पेरेरा यांनीही पाठिंबा दिला. या बैठकीत पाठिंबा देण्यासाठी लोलयेचे माजी सरपंच निशांत प्रभुदेसाई, नगरसेवक शुभम कोमरपंत, पैंगीणच्या माजी सरपंच दित्रोजा बार्रेटो, काणकोण गट काँग्रेस समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. तळपण येथील मच्छीमारबांधव अनिल केळुस्कर यानी 25 नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेची माहिती दिली आणि वारंवार अशा घटना घडत असतात, असे स्पष्ट केले. या बैठकीचे सूत्रसंचालन पंच नमशीकर यांनी केले.









