वेलिंग्टन : न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू मार्टिन स्नेडन यांची न्यूझीलंड क्रिकेटचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. ग्रेग बार्कली यांच्याकडे याआधी हे पद होते. पण आयसीसी अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यानंतर त्यांना हे पद सोडावे लागल्याने ते रिक्त झाले होते.
स्नेडन यांनी 1990-1992, 1999-2001 आणि त्यानंतर 2013 पासून आतापर्यंतच्या कालावधीत न्यूझीलंड क्रिकेटचे माजी प्रमुख कार्यकारी आणि मंडळाचे माजी सदस्य म्हणून कार्य पाहिले आहे. 1980 ते 1990 या कालावधीतील कारकिर्दीत त्यांनी 25 कसोटी व 93 वनडेत न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले होते. याशिवाय क्रीडा व्यवसायाचा त्यांना मोठा अनुभवही आहे. 2011 मधील रग्बी विश्वचषक स्पर्धा, न्यूझीलंडमधील डुको प्रमोशन्स अँड टुरिजम संघटना यात त्यांनी प्रमुख कार्यकारी अधिकारी पदाची भूमिका बजावली होती.
तसेच 2017 मध्ये झालेल्या वर्ल्ड मास्टर्स गेम्सचे ते संचालकही होते. आता आयसीसी मंडळात ते न्यूझीलंड क्रिकेटचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्याकडे सध्या न्यूझीलंडमधील वन क्रिकेट प्रकल्पाचे सल्लागारपद असून हे पद त्यांना आता ताबडतोब सोडावे लागणार आहे.









