प्रतिनिधी / कोल्हापूर
लाकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भविष्य निर्वाह निधी, ईलेक्ट्रॉनिक चलन कम रिटर्न भरण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे या महिन्यातील देयके भरण्यासाठी मुदवाढ मिळावी म्हणून खासदार संजय मंडलिक यांनी केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन ही देयके भरणेकरीता मुदतवाढ देत असल्याचे तातडीचे परिपत्रक केंद्र शासनाकडून काढल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली.
खासदार मंडलिक म्हणाले, लाकडाऊन सुरु झाल्याने 23 मार्चपासून सर्व आपत्कालीन व्यवस्था सोडून औद्योगिक वसाहती, इंडस्ट्रिज पुर्णतः बंद झाल्या. त्यामुळे, कर्मचाऱयांना कामावर हजर होणे शक्य नाही. परिणामी शासनाची मार्च महिन्याची भविष्य निर्वाह निधी, ईलेक्ट्रोनिक चलन कम रिटर्नची रक्कम भरणे व्यावसायीकांना शक्य नाही. त्यामुळे ही देयके भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी निरनिराळ्या औद्योगिक संघटनांकडून होत होती. यासंदर्भात, केंद्रीय श्रममंत्री यांना निवेदनाव्दारे कळविले असता त्यांनी तातडीने यासाठी मुदवाढ देत असल्याचे परिपत्रक जारी केल्याने व्यावसायीक, उद्योजक यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्याबाबत चेंबर ऑफ स्माल स्केल इंडस्ट्रिज-ठाणे, ठाणे स्माल स्केल इंडस्ट्रिज-ठाणे, कोल्हापूर इंजिनीअरिंग असो, लक्ष्मी इंडस्ट्रिअल असो., परभणी जिल्हा औद्योगिक संघ, उत्तर महाराष्ट्र इंजी. असो., आदींनी योग्य वेळेस हा निर्णय झाल्याने आभार मानल्याचे खासदार मंडलिक यांनी स्पष्ट केले.