प्रतिनिधी / पणजी
पणजीतील मासळी मार्केट खुले केले असले तरी त्यास विक्रेत्यांनी, ग्राहकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. मार्केटमध्ये केवळ किरकोळ विक्रेतेच होते आणि ग्राहकांची संख्याही अल्प, असे चित्र पाहायला मिळाले. पुरेशी मासळी आली नाही व त्यामुळे विक्रेते आले नाहीत, असे दिसून आले.
55 विक्रेत्यांना मार्केटमध्ये परवानगी देण्यात आली होती. तथापि, शुकशुकाटच दिसून आला. मासळीचा साठाही मर्यादित होता. त्यामुळे तो लगेच संपला. मासळीचे दरही किलोच्या भावाने होते. त्यामुळे काही ग्राहकांनी मासळीकडे पाठ फिरवली.
केवळ गोमंतकीय विक्रेत्यांनाच मासे विक्रीची अनुमती देण्यात आली होती. पहिलाच दिवस आणि लॉकडाऊनही सुरू असल्याने लोक घरबाहेर पडू शकत नाहीत. त्याचा परिणाम मासळी मार्केटवर दिसून आला. मास्क बांधणे तसेच सामाजिक अंतर हे नियम मार्केटमध्ये पाळण्यात आले. गर्दी होऊ नये म्हणून मर्यादित ग्राहकांना सोडण्यात येत होते. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
उद्यापासून मार्केटमधील दुकाने सुरू
दरम्यान, पणजी मार्केटमधील इतर दुकाने लवकरच सुरू करण्यात येणार असून त्यासाठी मार्केट असोसिएशनशी चर्चा केली जाणार आहे. मार्केटमध्ये इतर दुकाने बंदच असून ती काही प्रमाणात सुरू करण्याची अनुमती मिळल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली. मंगळवार पासून ती दुकाने सुरू होतील, असेही ते म्हणाले.









