प्रतिनिधी / विटा
मायणी रस्त्यालगत असणाऱ्या माळरानात रविवारी दुपारी भीषण आग लागली. तब्बल दोन किलोमीटर परिसरातील झाडे आगीच्या विळख्यात सापडली. अग्निशमन विभागासह तरुणांचे आग विझवण्यासाठी शर्तींचे प्रयत्न सुरू होते. तब्बल अडीच ते तीन तासांच्या कसरतीनंतर आग विझवण्यात यश आले.
विट्यातील मायणी रस्त्यालगत असणाऱ्या हॉटेल इस्ट इन इझीच्या मागील मोकळ्या रानात रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. वाऱ्याच्या प्रवाहामुळे बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केले. परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र वाऱ्याच्या झोताबरोबर वनवा पेटल्याप्रमाणे सर्वत्र आग पसरू लागली. तीव्र आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. परंतु झपाट्याने पसरत असणाऱ्या आगीमुळे तब्बल दोन किलोमीटरचा परिसर जळून भस्मसात झाला. यामध्ये अनेक झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यावेळी अग्निशमन विभागाच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगारदेवे यांचा मित्र परिवार आणि मनोज वाघमोडे यांनी ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तब्बल अडीच ते तीन तासानंतर ही संपुर्ण आग आटोक्यात आणण्यात यश आले.