12 वर्षाखालील आंतरक्लब फुटबॉल स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
धारवाड येथे विद्यागिरी फुटबॉल क्लब धारवाड आयोजित 12 वर्षाखालील आंतरक्लब मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात मानस स्पोर्ट्स डेव्हलपमेंट बेळगाव संघाने व्हीएफसी संघावर 5-0 अशी मात करून विद्यागिरी चषक पटकाविला. गौरांग उच्चुकरला उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत एकूण 10 संघांनी भाग घेतला होता. पहिल्या सामन्यात मानस स्पोर्ट्स संघाने खन्नूर स्पोर्ट्स अकादमीचा 3-1, दुसऱया सामन्यात अमित मासेकर इलेव्हन संघाचा 6-1 तर तिसऱया सामन्यात विद्यागिरी फुटबॉल क्लब धारवाडचा 6-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात मानस स्पोर्ट्स संघाने व्हीएफसी संघाचा 5-0 असा पराभव करून विद्यागिरी चषक पटकाविला. अंतिम सामन्यात अब्बास किल्लेदारने 3, गौरव गोधवानी व माझ चौधरी यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या मानस स्पोर्ट्स संघाला व उपविजेत्या व्हीएफसी संघाला चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरांग उच्चुकरला चषक देऊन गौरविले. या विजयी संघात गौरांग उच्चुकर, अर्चित पाटील, गौरव गोधवानी, अथर्व पाटील, माझ चौधरी, अब्बास किल्लेदार, आराध्य नाकाडी, हुसेन जमादार, वेदांत कब्बूरी, जैन मुल्ला, रेयांस एम. व रोशन आदी खेळाडूंचा समावेश आहे. या संघाला प्रशिक्षक मानस नायक यांचे मार्गदर्शन तर डॉ. प्रकाश पाटील व रवी पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









