भारताची असलेली प्रचंड मोठी लोकसंख्या, तिची घनता आणि असलेल्या तोकडय़ा आरोग्य सुविधा पाहता देश कोरोनाच्या साथीला विकसित देशांशी तुलना करता नक्कीच चांगल्या पद्धतीने तोंड देत आहे असे म्हणावे लागेल. पंतप्रधानांनी योग्य वेळी घेतलेले निर्णय, पूर्वीच्या सरकारांनी राबविलेल्या वेगवेगळय़ा लसीकरणामुळे देशातील लोकांमध्ये तयार झालेली प्रतिकारक्षमता, स्वच्छतेच्या व खाण्यापिण्याच्या काही जुन्या चांगल्या व सांस्कृतिक सवयी, योग आणि प्राणायामाचा वारसा व हल्ली त्यासंदर्भात आलेली जागरूकता ही कोविड 19 च्या महामारीशी तोंड देण्यासाठी उपयोगी पडत असण्याची संभाव्य कारणे असू शकतील. देशभरात स्वामी रामदेव आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर हे योग, प्राणायाम आणि ध्यानाद्वारे देशातील कोटय़वधी लोकांचे मनोबल व प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी निरंतर प्रयत्न करीत आहेत. सध्या बेंगलोरमध्ये व देशभरात आपल्या स्वयंसेवकांमार्फत हजारो गरिबांना अन्न पुरवण्याचे काम आर्ट ऑफ लिव्हिंग करीत आहे.
शेकडो वर्षांपासून हिंदू धर्मियांचे धर्मांतर होत आले आहे. क्वचित घरवापसी झाल्याच्या बातम्या कानावर येतात. पण इतरधर्मीय हिंदू झाल्याचे फारसे पहायला मिळत नव्हते. पण गेल्या काही वर्षांपासून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रसारामुळे अनेक इतर धर्मीय, विशेषतः इतर देशातील लोक हिंदू धर्माकडे आकर्षित होत आहेत. श्री श्री रविशंकर आध्यात्मिक गुरु असून धर्मगुरु नाहीत. जगभरातील दीडशेहून अधिक देशात त्यांचे कोटय़वधी अनुयायी तयार झाले असून ते सांगत असलेल्या तत्त्वज्ञानाकडे जगभरातील लोक सकारात्मकतेने पहात आहेत. रामजन्मभूमी वाद सलोख्याने सुटावा म्हणून सर्वोच्च न्यायालयाने तीन तज्ञ लोकांची नेमणूक केली होती, त्यातील एक श्रीश्री रविशंकर होते. आज 13 मे हा त्यांचा वाढदिवस. जगभरातील त्यांचे अनुयायी त्यांचा वाढदिवस पारंपरिक पद्धतीने मोठय़ा प्रमाणावर साजरा करतात. सध्या लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते दिवसातून दोन वेळा, दुपारी 12 वा. व संध्याकाळी साडेसात वा. ऑनलाईन मेडिटेशन घेतात. त्यात भारतासह 140 देशातील लाखो लोक सहभागी होतात. गुरुजी त्यावेळी अनेक प्रश्नांना उत्तरे देतात. विशेषतः मनोबल आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय सुचवतात. सकाळीही ऑनलाईन साधना घेतली जाते. त्यात सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम, सुदर्शन क्रिया आणि ध्यान घेतले जाते. श्री श्री रविशंकर ऊर्फ गुरुजींच्या 64 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी स्थापन केलेली आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था करत असलेल्या सामाजिक, आध्यात्मिक व आरोग्यविषयक कार्याची माहिती घेणे उद्बोधक ठरेल.
उत्तम जीवन कसे जगावे हे शिकवणारी आर्ट ऑफ लिव्हिंग ही सामाजिक संस्था(एनजीओ) असून ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे तिचे बोधवाक्मय आहे. ही एक उच्च मानवी मानवी मूल्ये जपणारी, तणावमुक्त जीवन जगण्यास शिकवणारी आणि सेवाभाव जागृत करणारी शैक्षणिक संस्था आहे. देशांतर्गत परिस्थिती, शेजारी देशांचे अवास्तव वागणे आणि सुरू असलेली कोरोना महामारीची साथ यामुळे देश अतिशय कठीण परिस्थितीतून जात आहे. सर्वच राजकीय पक्ष देशहिताला तिलांजली देत राजकारण करण्यात दंग आहेत, त्यामुळे देशभक्त, सशक्त, जातीधर्माच्या बाहेर जाऊन विचार करणारी, नैतिक मूल्ये जपणारी जबाबदार तरुण पिढी निर्माण करणे आवश्यक आहे. हे महत्त्वाचे काम आर्ट ऑफ लिव्हिंग इमाने इतबारे करते आहे.
देशातील दोन नंबरचा सर्वोच्च समजला जाणारा ‘पद्मविभूषण’ पुरस्कार विजेते मानवतेचे पुजारी श्री श्री रविशंकर यांनी 1981 मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगची स्थापना केली. 1989 मध्ये अमेरिका व जर्मनीमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनची स्थापना झाली आणि जगभर संस्थेचा पसारा वाढू लागला. आपल्याकडे एखाद्या व्यक्तीचे भक्त खूप वाढले की तिचे रूपांतर महामानवात आणि नंतर देवात केले जाते. गुरुजींनाही त्यांचे काही भक्त देवाचे अवतार, तर काही थेट देवच मानतात. खरेतर गुरुजी हे मानवतेचे पुजारी असून सर्व मानव जातीचे कल्याण या एकमेव ध्येयाने प्रेरित होऊन काम करणारे मानवी स्रोत आहेत. फार तर त्यांना महामानव म्हणता येईल. ते धर्मगुरु नसून एक आध्यात्मिक गुरु आहेत हे महत्त्वाचे आहे. मन निरोगी असेल तर शरीरही निरोगी राहते या तत्त्वानुसार गुरुजींनी ध्यानाच्या, प्राणायामाच्या अनेक पद्धती विकसित केल्या आहेत. आपल्या श्वसनावर आधारित शरीरात ऊर्जा निर्माण करणारी, मन शांत करीत एकाग्रता शिकविणारी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आणि एकंदरीतच निरोगी शरीर व मन बनवणारी सुदर्शन क्रिया ही एक गुरुजींनी स्वतः विकसित केलेली श्वसनप्रक्रिया आहे. सध्या याचे ऑनलाईन कोर्सेस चालू आहेत. हजारो वर्क फ्रॉम होमवाले याचा फायदा घेत आहेत.
गेल्या 40 वर्षातील या संस्थेचा प्रसार, व्याप्ती आणि कार्य थक्क करणारे आहे. संस्था आता जगभर दीडशेहून अधिक देशात कार्यरत असून सुमारे 40 कोटी लोकांच्या जीवनावर संस्थेच्या कार्याचा आणि संस्कारांचा प्रभाव आहे. दररोज हजारोंच्या संख्येने लोक आर्ट ऑफ लिव्हिंगला जोडले जात आहेत. ‘तणावमुक्त मन आणि हिंसामुक्त समाज असल्याशिवाय या जगात आपण शांतता निर्माण करू शकणार नाही’ हे गुरुजींचे जागतिक शांततेसाठीचे तत्त्वज्ञान आहे. या त्यांच्या तत्त्वज्ञानाचा उपयोग गेली कित्येक वर्षे अशांत असलेल्या कंबोडियाला झाला व तेथील राष्ट्राध्यक्षाला शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला. त्यात गुरुजींचा मोलाचा वाटा होता. देशातील पूर्वोत्तर राज्यांमध्ये असलेला वादही गुरुजींनी यशस्वीरित्या मिटविला आहे.
आर्ट ऑफ लिव्हिंगने मराठवाडय़ातील दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त तीन चार जिह्यात शेतकऱयांचे मनोबल वाढविणे, नैसर्गिक शेती आणि जलसंधारण अशा क्षेत्रात उत्तम काम केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी याबद्दल गुरुजींचा खास सत्कार केला होता. दोन समाजातील, देशांमधील तंटानिवारण, नैसर्गिक आपत्तीत मदत, व्यसनमुक्ती, ग्रामीण विकास, स्त्रीशक्तीविकास, कैद्यांचे पुनर्वसन, सर्वांना शिक्षण, प्रदूषणमुक्त वातावरण अशा प्रकारच्या उच्च मानवी मूल्यांवर काम करीत जगभर शांतता निर्माण करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यरत आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे मुख्यालय बंगलोरला असून जगातील सर्व जातीधर्माचे लोक आर्ट ऑफ लिव्हिंगशी जोडले गेलेले आहेत. शिक्षक आणि स्वयंसेवक ही आर्ट ऑफ लिव्हिंगची खरी शक्ती आहे.
इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ह्यूमन व्हय़ॅल्यूज, वेद विज्ञान महाविद्यापीठ, श्री श्री विद्यापीठ कटक, श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, भारतीय व्यक्ती विकास केंद्र, श्री श्री ग्रामीण विकास कार्यक्रम, श्री श्री इन्स्टिटय़ूट ऑफ ऍग्रीकल्चरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी ट्रस्ट श्री श्री आयुर्वेद अशा अनेक संस्थांद्वारा आर्ट ऑफ लिव्हिंग जगभर मानव कल्याणासाठी काम करते आहे. युनोच्या वेगवेगळय़ा संस्थांबरोबर टायअप असून मोठय़ा प्रमाणावर जगभर शांतता आणि मानवी मूल्यवर्धनाची कामे चालू आहेत. संस्थेने मार्च 2016 मध्ये दिल्ली येथे ‘वर्ल्ड कल्चरल फेस्टिव्हल’ भरवून जगभरच्या कलाकारांना एकत्र आणत जागतिक विक्रम केला होता. मुळा, मुठा, राम, पवना, इंद्रायणी, कृष्णा आणि गोदावरी या नद्या स्वच्छ करण्याचे काम आर्ट ऑफ लिव्हिंगने स्वखर्चाने केले आहे. अशा या मानवतेच्या पुजाऱयाला ‘शतायुषी व्हा’ ही मनोमन शुभेच्छा.
विलास पंढरी – 9860613872








