प्रतिनिधी/ बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कलामंदिर येथील बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू असून आवश्यक खबरदारी घेण्यात आली नसल्याने मातीचा ढिगारा कोसळून अकरा दुचाकी गाडय़ा ढिगाऱयाखाली गाडल्या गेल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. यामुळे दुचाकी वाहनांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱया विकासकामांबाबत तक्रारींचा भडीमार होत आहे. मात्र, सोमवारच्या घटनेमुळे स्मार्ट सिटी कामाच्या दुर्लक्षाचा नमुना चक्हाटय़ावर आला आहे.
शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्यांचा विकास, बहुमजली व्यापारी संकुलांची उभारणी तसेच मध्यवर्ती बसस्थानकाचा विकास आदी कामांसह विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. सदर कामे करताना कोणतेच नियोजन करण्यात येत नसल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. रस्त्यांचे काँक्रिटीकरण करत असताना आवश्यक खबरदारी घेण्यात आली नसल्याने वाहनांचे अपघात घडले आहेत. काही ठिकाणी खोदण्यात आलेल्या खड्डय़ांमध्ये वाहने जावून वाहनधारक आणि वाहनांचे नुकसान झाले होते. पण आता कलामंदिर येथे उभारण्यात येणाऱया बहुमजली व्यापारी संकुलाच्या ठिकाणी आवश्यक खबरदारी घेण्यात आली नसल्याने अकरा दुचाकी गाडय़ा मातीच्या ढिगाऱयाखाली गेल्याची घटना सोमवारी घडली.
कलामंदिरच्या जागेत इमारतीचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी चारही बाजूने पत्र्याची संरक्षक भिंत उभारण्यात आली होती. पण खोदाई करताना पत्र्याशेजारी माती टाकण्यात आल्याने पत्र्यावर मातीचे ढिगारे साचले होते. मातीचे वजन जास्त झाल्याने सदर पत्रे वाकून मातीचा ढिगारा शुक्रवारपेठ रस्त्यावर कोसळला आहे. या ठिकाणी पार्क करण्यात आलेल्या वाहनांवर ढिगारा कोसळल्याने अकरा वाहने मातीच्या ढिगाऱयाखाली सापडली आहेत. कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे वाहनांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून स्मार्ट सिटीच्या कामाबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. निष्काळजीने कामे करणाऱया कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, तसेच वाहनधारकांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
सध्या दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत आहेत. टिळकवाडी देशमुख रोड परिसरात वाहने पार्क करण्यास अडचण असल्याने शुक्रवारपेठ रस्त्याशेजारी वाहने पार्क करण्यात येतात. परिसरात हॉटेल व विविध व्यवसाय असल्याने वाहनधारक वाहने पार्क करतात. पण स्मार्ट सिटीच्या कामाचा फटका नागरिकांना बसला आहे.
स्मार्ट सिटीची कामे करताना आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना कंत्राटदाराला केली होती. पण कलामंदिरच्या ठिकाणी कंत्राटदाराने खबरदारी घेतली नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. पत्र्याच्या भिंतीवर माती टाकण्यात आल्याने वजनामुळे पत्रे वाकून ढिगारा कोसळला आहे. त्याबाबत कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात येईल तसेच मातीच्या ढिगाऱयाखाली अडकलेल्या वाहनधारकांना नुकसानभरपाई देण्याची सूचना करण्यात येईल, अशी माहिती स्मार्ट सिटी कंपनीचे साहाय्यक कार्यकारी अभियंते कृष्णमूर्ती चन्नगिरी यांनी दिली.









