प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात आज एकूण १२ जण पॉझिटीव्ह असून रिधोरे येथे ९ जणांना तर कुर्डुवाडी शहरातील तीघांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची माढा तालुक्यातील एकूण संख्या ८५ वर पोहचली आहे.
कोरोनाने आता कुर्डुवाडी येथील रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्यात देखील प्रवेश केला असून पोलिस ठाण्यातील एका अधिकारी, कर्मचाऱ्यासह शहरातील आणखी एकास असे एकूण तीघाजणांना कोरनाची लागण झाली असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोष अडागळे यांनी सांगितले.
येथील रेल्वे पोलिस अधिकारी पुणे येथे उपचार घेत असून ते कोरोनाबाधित असल्याचा अहवाल मिळताच येथील त्यांच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांसह तालुक्यातील एकूण ९८ जणांची रॅपीड अँटीजेन टेस्ट घेण्यात आली यावेळी कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिस ठाण्यातील एक पोलिस कर्मचारी व रिधोरे येथील ९ जण पाॅझिटीव्ह असल्याचे आढळले. तर बाकी ८८ जण निगेटिव्ह आले आहेत. रिधोरे येथील ९ व रेल्वे पोलिस हे कुर्डुवाडी येथील कोविड सेंटर मध्ये उपचार घेत आहे.
तर कुर्डुवाडी येथील तिसरा बाधित रुग्ण हा जूना बारलोणी रस्त्यावरील चौधरी वस्ती येथील असून तो बार्शी येथे उपचार घेत आहे . आज आढळलेल्या कुर्डुवाडी येथील तीन बाधितांसह आता कुर्डुवाडी शहरातील बाधितांची संख्या ही १६ झाली असून तालुक्यातील बाधितांची एकूण ८५ झाली आहे.








