ओटवणे/ प्रतिनिधी-
पोलीस दलातील गुणवत्तापूर्ण सेवा व नक्षलग्रस्त भागातील खडतर कामगिरीबद्दल माडखोल गावचे सुपुत्र तथा रायगडचे पोलीस उपनिरीक्षक संजय सावंत यांना स्वातंत्र्यदिन सन २०२१ चे गुणवत्तापूर्ण सेवेबद्दलचे राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले असुन उद्योग, खनिकर्म, पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले.
यावेळी रायगड जिल्ह्याधिकारी निधी चौधरी, रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक संजय सावंत हे ९ फेब्रुवारी १९८८ रोजी रायगड जिल्हा पोलिस दलात भरती झाले. त्यानंतर ऑक्टोबर २०२० पासून ते वाचक शाखा येथे कार्यरत आहेत. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून त्यांनी एम. कॉम व संगणक क्षेत्रात एम. सी. ए. असे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
त्यांच्या आजपर्यंतच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह (२०११) तसेच विविध ३२५ बक्षिसांनी गौरविण्यात आलेले आहे. श्री. सावंत यांनी ३४ वर्षे उत्कृष्ट व प्रामाणिक उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल त्यांना स्वातंत्र्यदिन सन २०२१ चे गुणवत्तापूर्ण सेवेबद्दलचे राष्ट्रपतींचे पोलीस पदक प्रदान करण्यात आले. संजय सावंत हे माडखोल डुंगेवाडी येथील उमेश सावंत यांचे सख्खे चुलत भाऊ आहेत.









