कायदेशीर लढा देणार असल्याचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
मी खूप निराश आहे. माझ्या विरोधात मोठे षङ्यंत्र रचण्यात आले. मात्र, मी निरपराध आहे. सीडी प्रकरण झाल्यानंतर मी तातडीने राजीनामा दिला. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. माझ्यावर जे षङ्यंत्र रचण्यात आले आहे त्या विरोधात मी आता लढा देणार असल्याचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी बेंगळूर येथे प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केले.
सीडी प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन पहिल्यांदाच रमेश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. सीडी प्रकरणामध्ये काही मंडळी सामील आहेत. या प्रकरणातील तरुणीला 5 कोटींहून अधिक रक्कम देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. माझ्या विरोधात षङ्यंत्र रचण्यासाठी त्या तरुणीला पुढे आणण्यात आले. त्यासाठी मोठय़ा रकमेबरोबरच परदेशातदेखील दोन फ्लॅट त्या तरुणीला देण्यात आले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आता या विरोधात मी कायदेशीर लढा देणार आहे. माझे भाऊ भालचंद्र जारकीहोळी यांच्या प्रत्येक सूचनेनुसार मी काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. माझ्यावर ज्यांनी विश्वास दाखविला तसेच माझ्या बाजूने ठामपणे उभे राहिले त्यांचे मी मनापासून आभार मानतो. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, माजी उपमुख्यमंत्री कुमारस्वामी यांचाही मी आभारी आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.









