ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तान कोणत्याही दहशतवादाचे समर्थन करत नाही, अथवा त्याला पाठिंबा देत नाही. पुलवामाबद्दल मी संसदेत केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असे पाकिस्तानचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा परिसरात 14 फेब्रुवारी 2019 मध्ये सीआरपीएफ पथकावर आत्मघातकी हल्ला झाला होता. 44 भारतीय जवान या हल्ल्यात शहीद झाले होते. यात पाकिस्तानचा हात होता.इम्रान खान सरकारच्या नेतृत्वाखालील पुलवामातील हल्ल्याचे यश या देशाचे यश आहे. तुम्ही-आम्ही सर्वजण या यशाचा भाग आहोत, अशी कबुली चौधरी यांनी गुरुवारी पाक संसदेत दिली होती.
सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर चौधरी यांनी यू-टर्न घेतला आहे. भारताने पाकिस्तानात घुसून बालकोटमध्ये कारवाई केल्यानंतर करण्यात आलेल्या स्विफ्ट रिसॉर्ट ऑपरेशनबद्दल मी बोलत होतो. मात्र, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे फवाद यांनी म्हटले आहे.









