ऑनलाईन टीम / चंद्रपूर :
राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संजय देवतळे यांचे कोरोनाने उपचारादरम्यान निधन झाले. मागील 6 दिवसांपासून त्यांच्यावर नागपूरमधील श्रीराम रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.
देवतळे 4 वेळा काँग्रेसच्या तिकिटावर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासह राज्याच्या पर्यावरण, सांस्कृतिक मंत्रिपदाचा कारभारासुद्धा त्यांनी सांभाळला होता. 2014 मध्ये मंत्री असतानाच ते लोकसभेची निवडणूक लढले. त्यात त्यांचा पराभव झाला. 2019 ची निवडणूक त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती. पुन्हा शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत देवतळे यांनी 2020 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता.