बेळगाव : कर्नाटक विद्यापीठाचे माजी कुलगुरु व बेळगावमधील जे. एन. वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एस. जी. देसाई यांचे शुक्रवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास निधन झाले. ते 96 वर्षांचे होते. शनिवारी सायंकाळी 4 वाजता सदाशिवनगर येथील वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
25 सप्टेंबर 1925 रोजी जन्मलेल्या डॉ. देसाई यांचे सुरुवातीचे शिक्षण गदग आणि धारवाड येथे झाले. त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये पूर्ण केले. त्यांनी 1950 साली एमबीबीएस, 1953 मध्ये एमडी जनरल मेडिसिन आणि 1954 मध्ये डीसीएच पदवी संपादन केली. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात वैद्यकीय प्राध्यापक म्हणून करिअर करण्याचा निर्णय घेतला. प्रथम ग्रँट मेडिकल कॉलेज, बॉम्बे येथे तीन वर्षे वैद्यकीय निबंधक म्हणून तर 1955-60 पासून साहाय्यक प्राध्यापक म्हणून हैदराबादच्या उस्मानिया वैद्यकीय महाविद्यालय, नंतर कर्नाटक वैद्यकीय महाविद्यालय, हुबळी येथे 1960 ते 1971 बालरोग विभागाचे प्राध्यापक व प्रमुख म्हणून काम पाहिले. 1971 ते 1984 पर्यंत बेळगावमधील केएलईच्या जे. एन. मेडिकल कॉलेजचे प्राचार्यपद सांभाळले होते.
हुबळी येथील केएमसीमध्ये सेवा बजावत असताना संस्थापक प्राध्यापक म्हणून त्यांनी बालरोग विभागाचा नावलौकिक वाढविला. परिणामी सरकार आणि विद्यापीठाला 1965 मध्ये बालरोगशास्त्रातील एमडी कोर्स कर्नाटकातील इतर कोणत्याही केंद्रापेक्षा खूप आधी सुरू करण्यास मदत झाली.
बेळगाव येथील जे. एन. वैद्यकीय महाविद्यालयात प्राचार्य असताना त्यांनी शैक्षणिक उपक्रमात दिलेल्या योगदानामुळे एम. सी. आय. आणि कर्नाटक विद्यापीठाने त्यांना विविध विषयांमध्ये पदव्युत्तर कोर्स सुरू करण्याची परवानगी दिली.
कर्नाटकच्या तत्कालीन राज्यपालांनी डॉ. देसाई यांच्या प्रशासकीय आणि शैक्षणिक कार्यातील योगदानाची दखल घेऊन 1984 साली धारवाडमधील कर्नाटक विद्यापीठ धारवाडचे कुलगुरु म्हणून नियुक्ती केली. डॉ. देसाई यांनी हे पद 1987 पर्यंत अत्यंत यशस्वीपणे भूषवले. या विद्यापीठातून कुलगुरु म्हणून नियुक्त होणारे डॉ. देसाई हे पहिले वैद्यकीय प्राध्यापक होते.
डॉ. देसाई कर्नाटक युनिव्हर्सिटी धारवाडशी सक्रियपणे जोडले गेले होते. अभ्यास मंडळ, सिनेट आणि शिक्षण परिषदचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. ते दोन टर्ममध्ये वैद्यकीय शाखेचे डीन होते. ते 5 वर्षे दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय परिषदेचे सदस्य होते. 1983 च्या दरम्यान त्यांना अमेरिका व कॅनडामधील वैद्यकीय संस्थांना भेट देण्यासाठी डब्ल्यूएचओकडून फेलोशिप देण्यात आली.
डॉ. देसाई यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केल्यावर राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठात त्यांच्या नावाने एमबीबीएस परीक्षेत बालरोग विषयात प्रथम येणाऱया विद्यार्थ्याला दरवषी प्रा. एस. जी. देसाई सुवर्णपदक प्रदान करण्यास सुरुवात झाली. डॉ. देसाई यांनी डॉ. राजकिशोरी आणि डॉ. संगप्पा देसाई प्रति÷ान या नावाने एक नोंदणीकृत सोसायटी स्थापन केली. यामार्फत सामान्य आणि वैद्यकीय शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. डॉ. देसाई 1987 मध्ये औपचारिकरित्या निवृत्त झाले असले तरी बेळगावचे सल्लागार फिजिशियन आणि बालरोगतज्ञ म्हणून अजूनही सक्रिय होते. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि दोन मुलगे आहेत. दोन्ही मुली आणि एक मोठा मुलगा बालरोगतज्ञ आहेत आणि लहान मुलगा अभियंता असून अमेरिकेत स्थायिक आहे.









