कोविड हॉस्पिटलात चारजण ‘आयसीयू’त
प्रतिनिधी / मडगाव
उत्तर गोव्यातील एका माजी आरोग्यमंत्र्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याने, त्यांना मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कोविड हॉस्पिटलाच्या डॉक्टरांनी दिली.
या माजी आरोग्यमंत्र्याला मूत्रपिंडाचा आजार असून त्यांना डायलिसिस करावी लागते. काल मंगळवारी त्यांना डायलिसिस करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्याकडे संपर्क साधून विचारपूस केली. या माजी आरोग्यमंत्र्यांवर पणजीतील दोन खाजगी हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन आठवडय़ापासून डायलिसिस सुरू होते. दोन्ही हॉस्पिटलमधील डायलिसिस विभाग तात्पुरते बंद करण्यात आले असून त्यांचा ज्या लोकांकडे संपर्क आला, त्या सर्वांचा शोध घेऊन त्यांची चाचणी केली जाणार आहे.
दरम्यान, कोविड हॉस्पिटलाच्या अतिदक्षता विभागात माजी मंत्र्यासहीत अन्य तिघांवर उपचार सुरू असून सर्वाची प्रकृती स्थिर आहे. एका 80 वर्षीय महिलेची प्रकृती क्रिटिकल मानली जात असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. काल कोविड हॉस्पिटलातून सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
दोघांवर अत्यसंस्कार करण्यास पोलिसांची मान्यता
कोविड हॉस्पिटलात सोमवारी दोघांना मृत्यू आला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कोविड हॉस्पिटलने पोलिसांकडे ना हरकत दाखला मागितला होता. तो देण्यात आल्याची माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गांवस यांनी दिली. या मयतांवर कोणत्याही क्षणी अत्यंसंस्कार केले जाऊ शकतात. त्यासदंर्भातील अंतिम निर्णय हा जिल्हाधिकाऱयांनी घ्यायचा आहे.









