सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला : निफ्टीही घसरणीसह बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात मंगळवारी मागील पाच सत्राच्या तेजीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. यामध्ये दोन्ही निर्देशांकात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला जागतिक पातळीवर नकारात्मक कल राहिल्याने बाजारात मजबूत स्थितीत असलेल्या मुख्य समभागांमध्ये घसरगुंडी राहिल्याचे दिसून आले.
प्रमुख कंपन्यांमध्ये मंगळवारी रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 709.17 अंकांनी घसरुन 55,776.85 वर बंद झाला आहे. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 208.30 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 16,663.00 वर बंद झाला आहे.
देशातील सर्वात मूल्यवान कंपनी असणाऱया रिलायन्स कंपनीचे समभाग 55.10 रुपयांनी म्हणजे 2.28 टक्क्यांनी प्रभावीत होत बंद झाला आहे. अन्य कंपन्यांमध्ये टाटा स्टील, टेक महिंद्रा बँक, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, ऍक्सिस बँक आणि एचसीएल टेक यांचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, मारुती सुझुकी, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स आणि टायटन यांचे समभाग तेजीत राहिले होते.
जागतिक पातळीवरील आशियातील अन्य प्रमुख बाजारात हाँगकाँगचा हँगसेंग आणि चीनचा शांघाय कम्पोझिट हे बाजार पुन्हा कोरोना संसर्गामुळे चिंता निर्माण झाल्याने नुकसानीसह बंद झाले आहेत. दुसरीकडे जपानच्या निक्कीत हलकीशी तेजी राहिली.
का आली घसरण ?
रशियावर गॅस आयातीची बंदी घालण्यासोबत नवीन आर्थिक व व्यापारी निर्बंध लागू केल्याने जागतिक बाजारात तेजीचा कल कायम ठेवण्यात बाजाराला अपयश आले आहे. तसेच रशिया युक्रेन यांच्यातील युद्धजन्य स्थिती सावरत असल्याचाही परिणाम बाजारावर होत असून अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकी अगोदरच जगातील प्रमुख बाजारात घसरण राहिल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे.









