सिडनी :
आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत कसोटी प्रकारात खेळताना प्रतिस्पर्धी सर्वोत्तम कसोटी संघाची निवड ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू माईक हसीने करताना भारताच्या सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली यांचा समावेश केला आहे. 2005 ते 2013 या आठ वर्षांच्या क्रिकेट कालावधीत माईक हसीने कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले होते. जगातील एक सर्वोत्तम सलामीचा फलंदाज म्हणून माईक हसीची गणना कसोटी क्रिकेटमध्ये केली जाते. 44 वर्षीय माईक हसीने सर्वोत्तम प्रतिस्पर्धी कसोटी संघाची निवड आपल्या पसंतीने करताना स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथ यांना सलामीच्या जोडीसाठी पसंती दिली आहे. त्यानंतर फलंदाजांच्या क्रमवारीत विंडीजचा ब्रायन लारा, भारताचे सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा जॅक्वीस कॅलीस, लंकेचा कुमार संगकारा यांना स्थान दिले आहे.
हसीच्या या संघात सचिनला चौथ्या तर कोहलीला पाचव्या क्रमांकावर निवडले आहे. दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज डेल स्टीन, मॉर्नी मॉर्कल आणि इंग्लंडचा अँडरसन तसेच लंकेचा मुरलीधरन यांना हसीने निवडले आहे. मात्र हा संघ निवडताना आपल्याला धोनीला वगळताना खूप अवघड गेल्याचे त्याने सांगितले. माईक हसीने या संघात यष्टीरक्षक म्हणून लंकेच्या कुमार संगकाराला अधिक पसंती दिली.
माईक हसीचा सर्वोत्तम प्रतिस्पर्धी कसोटी संघ- सेहवाग, ग्रीम स्मिथ, लारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, कॅलीस, संगकारा, स्टीन, एम. मॉर्कल, अँडरसन आणि मुरलीधरन.









