रुग्णालयातील पित्याचे छायाचित्र प्रसारित होण्याचा मुद्दा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची कन्या दमन यांनी पित्याच्या उपचारादरम्यानची छायाचित्रे माध्यमांमध्ये झळकल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. माझे पालक अवघड स्थितीचा सामना करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते वृद्ध लोक आहेत, प्राणिसंग्रहालयातील प्राणी नव्हते असे दमन यांनी म्हटले आहे.
मनमोहन यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी रुग्णालयात जात त्यांची विचारपूस केली होती. मांडविया यांनी या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली होती.
माझ्या पित्यावर एम्समध्ये डेंग्यूसाठी उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, पण रोगप्रतिकारक क्षमता कमी झाली आहे. आरोग्यमंत्र्यांनी दिलेली भेट आणि चिंता व्यक्त करणे चांगले वाटले, पण माझे पालक त्यावेळी छायाचित्रे काढून घेण्याच्या स्थितीत नव्हते. माझ्या आईने छायाचित्रकाराला कक्षाबाहेर जाण्यास सांगितले होते, पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा दमन यांनी केला आहे.
खासगीत्व राखणे गरजेचे
रुग्णांचे खासगीत्व कायम राखणे नैतिकदृष्टय़ा गरजेचे असल्याचे याप्रकरणी डॉक्टरांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्र्यांकडून शेअर करण्यात आलेल्या छायाचित्रांवर लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांचा संताप पाहता मांडविया यांनी छायाचित्रे डिलिट केली आहेत. डॉक्टर आणि एम्स व्यवस्थापनाने छायाचित्रकाराला आत कसे शिरू दिले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.









