त्रिवेंद्रम / वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांनी शनिवारी केरळच्या साबरीमला मंदिरात जाऊन भगवान आयप्पांचे दर्शन घेतले आहे. काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या मंदिरात विशिष्ट वयोगटातील महिलांना प्रवेश नाकारण्याची प्रथा बेकायदेशीर ठरविली होती. त्यावेळी न्या. इंदू मल्होत्रा यांनी या बहुमताच्या निर्णयाला विरोध करत आपला वेगळा निर्णय दिला होता. त्यांनी आपल्या निर्णयात साबरीमलाच्या परंपरेचे समर्थन करत त्यात हस्तक्षेप केला जाऊ नये असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे त्यांच्या या दर्शनाला महत्व प्राप्त झाले आहे.
साबरीमलाच्या मंदिरात सर्व वयाच्या महिलांना प्रवेश दिला जावा, अशी मागणी करणाऱया याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आल्या होत्या. मंदिराची प्रथा केवळ रजोनिवृत्ती झालेल्या महिलांना मंदिरात प्रवेश देण्याची होती. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांनी चार विरुद्ध एक अशा बहुमताने या याचिकांमधली मागणी वैध ठरविली होती. त्यामुळे सरकारला सर्व महिलांसाठी मंदिराचे दरवाजे उघडण्याचा आदेश देण्यात आला होता. पण न्या. मल्होत्रा यांनी मंदिराच्या परंपरेत हस्तक्षेप करता येणार नाही, असा निर्णय दिला होता.









