वृत्तसंस्था/रांची :
दोनच दिवसांपूर्वी 40 व्या वर्षात पदार्पण करणाऱया महेंद्रसिंग धोनीचे पुन्हा मैदानावर दर्शन होईल का, तो संघात परतेल का, याचे उत्तर देणे तूर्तास कठीण आहे. खुद्द धोनीने मौन बाळगणेच पसंत केले असल्याने याबाबतचे गूढ अधिक गडद होत राहिले आहे. पण, हाच धोनी या लॉकडाऊनच्या कालावधीत पूर्ण जोशाने सेंद्रीय शेतीकडे वळला असून रांचीनजीकच असलेल्या आपल्या 43 एकरी शेताकडे त्याची रोज किमान एक फेरी निश्चित होते. काही दिवसांपूर्वीच ट्रक्टर चालवत असल्याचा त्याचा व्हीडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
धोनीची शेती पूर्णपणे सेंद्रीय पण आधुनिक स्वरुपाची आहे. तंत्राची साथ हवी, म्हणून मैत्री फाऊंडेशनच्या पथकाची तो आवर्जून मदत घेतो. या पथकाचे सदस्य शेतीतील बारकावे सांगतात, त्यावेळी धोनी ते तल्लीन होऊन ऐकत असल्याचे, समजून घेत असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. ठिबक सिंचन व पॉली हाऊसचे प्रयोग धोनीच्या या आधुनिक शेतात राबवले गेले आहेत. काही क्विन्टल टरबूजाचे उत्पादन यापूर्वीच झाले असून त्याची बाजारात विक्री केली जाते. तीन प्रकाराची शिमला मिरची, स्वीट कॉर्न, बेबी कॉर्न पूर्ण पिकले आहेत किंवा अंतिम टप्प्यात आहेत. 10 एकर जागेतील कोबी व फ्लॉवरही उत्तम फुलले आहेत.
दूध व मत्स्यशेती हे शेतीचे पूरक घटक देखील धोनीच्या आधुनिक शेतीत समाविष्ट आहेत. साहिवाल जातीच्या 70 गायी असून ही संख्या 150 वर नेण्याचा त्याचा मानस आहे. दोन छोटय़ा तलावात मत्स्यपालनाचा प्रकल्पही कार्यरत आहे. धोनीने यातील उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रांचीत अनेक काऊंटर उभे केले आहेत, त्याची सुरुवात लॉकडाऊन संपल्यानंतर होईल. याशिवाय, ग्राहकांच्या घरी दूध पोहोचते करण्यासाठी बॅटरी रिक्षाची व्यवस्थाही केली गेली आहे.









