-‘कौन बनेगा करोडपती’मध्ये 40 लाखांची लॉटरी लागल्याचे आमिष
प्रतिनिधी/ खेड
‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमातंर्गत 40 लाख रुपयांची लॉटरी लागली असून करापोटी 8 लाख 76 हजार 500 रुपये भरावे लागतील, असे आमिष दाखवत तालुक्यातील कोंडीवली येथील सईदा जमालुद्दीन कटमाले या महिलेची अज्ञाताने पावणे नऊ लाखाची फसवणूक केली. ही घटना 15 ऑगस्ट रोजी रात्री 8 ते 16 रोजी सकाळी 6 च्या मुदतीत घडली. याप्रकरणी आकाश वर्मा नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
या महिलेला मोबाईलवरून कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात 40 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगितले. ही रक्कम घेण्यासाठी 8 लाख 76 हजार 500 रुपयांचा कर भरावा लागेल, असे सांगितले. महिलेच्या व्हॉट्सऍप क्रमांकावर दुबईच्या इस्लामी बँकेच्या 40 लाख रकमेच्या धनादेशाचे छायाचित्र, करांच्या पावत्या, आधारकार्ड व ओळखपत्र यांची छायाचित्रे पाठवून संशयिताने महिलेचा विश्वास संपादन केला. त्यांना वेगवेगळय़ा मोबाईल क्रमांकावरून फोन करून वेगवेगळय़ा बँक खात्यावर ही रक्कम भरण्यास सांगितले. त्यानुसार सईदा कटमाले यांनी रक्कम भरणा केली. त्यानंतर लॉटरीची रक्कम न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. त्यानुसार आकाश वर्मा नामक व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैषाली आडुरकर करीत आहे.









