गरिबीमुळे शस्त्रक्रियेचा खर्च न परवडणारा : नवरा अंध तर मुलगा मतिमंद अशी कौटुंबिक स्थिती
वार्ताहर / देवगड:
नवरा एका डोळय़ानी अंध तर मुलगा मतिमंद अशी स्थिती. त्यातच घरातील गरिबीमुळे आर्थिक चणचण असणाऱया मिठमुंबरी मधलीवाडी येथील सौ. सुषमा प्रकाश गावकर यांच्या उपचारासाठी मदतीचा हात मागण्यात येत आहे. सौ. सुषमा यांच्या पायाचे माकड हाड मोडले असून दोन लाख रुपये शस्त्रक्रियेसाठी आवश्यक आहेत.
मिठमुंबरी-मधलीवाडी येथे प्रकाश धोंडू गावकर, कु. आशिष प्रकाश गावकर व सौ. सुषमा प्रकाश गावकर हे कुटुंब राहते. अत्यंत गरीब कुटुंब असून उदरनिर्वाहासाठी कोणतेही साधन नाही. प्रकाश एका डोळय़ाने अंध असून मुलगा आशिष हा मतिमंद आहे. सौ. सुषमा याही सातत्याने आजारी असतात. या कुटुंबाला वाडीतील काही मंडळी आर्थिक मदतीचा हात देत असतात. तर प्रकाश नाईलाजास्तव घर चालावे, यासाठी गावातील मत्स्य व्यावसायिकांकडून मासे घेत विक्री करत असतात. त्यातही त्याला आर्थिक फायदा होत नाही. एका डोळय़ाने अंध असल्याने त्यातच मार्ग काढत वाडी-वस्त्यांमध्ये मिळालेल्या माशांमधील विक्रीतून प्राप्त पैस्यात मुलगा व पत्नीचा उदरनिर्वाह करतो. मात्र, हा व्यवसाय त्यांचा कायमस्वरुपी असा नसतो. राहते घरही पडक्या स्वरुपाचे त्यात कसेबसे हे कुटुंब राहते. सौ. सुषमा आठ दिवसांपूर्वी घरात पडल्या त्यात त्यांच्या पायाचे माकड हाड मोडले. तात्काळ देवगड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, पुढील उपचारासाठी शस्त्रक्रिया हाच पर्याय असल्यामुळे खासगी रुग्णालयाशिवाय त्यांच्यासमोर पर्याय उरला नाही. त्याच अवस्थेत त्या घरातच उपचाराविना राहिल्या होत्या. मात्र, गंभीर अवस्था झाल्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, पायाच्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे दोन लाख रुपयांची आवश्यकता आहे. एवढी रक्कम या कुटुंबाकडे नसल्याने गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीचा हात देण्याचे ठरविले आहे. या कुटुंबाला समाजातील दानशूर, सेवाभावी संस्थाकडून मदतीचा हात देण्याची गरज आहे. यासाठी बाबाजी तुळाजी गावकर यांच्या युनियन बँक शाखा देवगड (खाते क्रमांक-377302010005290) बॅँक खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी दयाळ गावकर (8482894565) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.









