पुणे / प्रतिनिधी :
महिलांच्या शाश्वत विकासासाठी विविध उपक्रमांतून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘फिक्की फ्लो’ पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा रितू प्रकाश छाब्रिया यांना सन्मानित करण्यात आले. ‘फिक्की फ्लो’च्या मावळत्या अध्यक्षा हरजिंदर कौर तलवार यांच्याकडून त्यांनी नुकत्याच झालेल्या एका व्हर्च्युअल सोहळ्यात हा सन्मान स्वीकारला. २०१९-२० या त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यातील १०० विधवा शेतकरी महिलांना बियाणे देऊन त्यांना शेती करण्यास प्रोत्साहन दिले. त्यातून आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आधार मिळाला असून, या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत.
शेतकरी आत्महत्या या सामाजिक प्रश्नावर लक्ष्य देऊन विधवा शेतकरी महिलांना उभे करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांना कौशल्याचे प्रशिक्षण, जमिनीची मालकी मिळवण्यात मदत आणि नियमित बियाण्यांचा पुरवठा केला जात आहे. यातील ६० टक्के महिला उत्तम शेती करत आहेत. त्यातून त्यानी त्यांच्या कर्जाची परतफेड केली आहे. तर जवळपास ८० टक्के महिला शेतकरी उत्साहाने शेती करत आहेत. नफ्यातील शेती करण्यासह बाजारांमध्ये उत्पादन नेण्याची आणि विकण्याची कला त्यांना अवगत झाली आहे. ८० ते ९० लाखांचे कृषीउत्पादन या महिलांनी घेतले आहे. हा उपक्रम कायमस्वरूपी चालू राहावा, यासाठी पुढील दोन वर्षांकरिता निधी वर्ग केलेला आहे, असे रितू छाब्रिया यांनी नमूद केले.








