वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची राष्ट्रीय महिला सायकलपटू त्रियाशा पॉल हिला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त रविवारी भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या (साई) प्रवक्त्याने दिली. ती येथे राष्ट्रीय सायकलींग सराव शिबिरासाठी दाखल झाली होती. सध्या तिला आयसोलेशनमध्ये ठैवण्यात आले आहे.
येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय स्टेडियममध्ये 14 ऑगस्टपासून राष्ट्रीय सायकलींग सराव शिबिराला प्रारंभ केला जाणार होता. पण आता हे शिबीर लांबणीवर टाकण्यात आले आहे. या शिबिरात दाखल होण्यासाठी त्रियाशाचे दिल्लीत 12 ऑगस्ट रोजी आगमन झाले होते. साईच्या नियमानुसार त्रियाशा पॉलची कोरोना चांचणी घेण्यात आली. या चांचणीत ती पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. या राष्ट्रीय सायकलींग सराव शिबिरात दाखल होण्यासाठी 11 सायकलपटू, 4 प्रशिक्षक आणि 16 सहाय्यक प्रशिक्षक वर्ग येथे आले आहेत. या सर्वजणांना क्वॉरेंटाईन करण्यात आले आहे. अखिल भारतीय सायकलींग फेडरेशनची बैठक सोमवारी घेतली जाणार असून या बैठकीत सराव शिबिराबाबत निर्णय घेतला जाईल, असे फेडरेशनचे अध्यक्ष ओकार सिंग यांनी सांगितले.









