वृत्तसंस्था/ वारसॉ
विद्यमान चॅम्पियन भारताच्या कोनेरू हंपीला आपल्या मानांकनाला साजेसा खेळ करता न आल्याने येथे झालेल्या महिलांच्या वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये 7.5 गुणांसह सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
खुल्या गटात भारताचा युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशने 9 गुण मिळवित नववे स्थान मिळविले. विजेता ठरलेल्या उझ्बेकच्या 17 वर्षीय नॉदिरबेक अब्दुसत्तोरोव्हने 9.5 गुण मिळविले. दहाव्या फेरीत गुकेशने इस्रायलच्या अनुभवी बोरिस गेलफँडला पराभवाचा धक्का दिल्यानंतर पुढच्या फेरीत जॉर्जियाच्या जोबावा बादुरवरही विजय मिळविला. त्यानंतरचे शेवटचे दोन सामने त्याने अनिर्णीत राखले. हंपीने बल्गेरियाच्या अलेक्झांड्रा कोस्टेनियुकला बरोबरीत रोखत शेवटच्या दिवसाची सुरुवात केली. त्यानंतरच्या दोन डावांतही तिने बल्गेरियाच्या ऍटोनेटा स्टेफानोव्हा व अझरबैजानच्या गुलनार मॅमाडोव्हा यांना बरोबरीत रोखले. महिला विभागात आर. वैशाली ही भारताची दुसरी सर्वोत्तम परफॉर्मर ठरली. तिने 7 गुणांसह 14 वे स्थान मिळविले. त्यानंतर वंतिका अग्रवाल (6 गुण, 38 वे स्थान), पद्मिनी राऊत (5.5, 49) यांनी क्रमांक मिळविले.
कोस्टेनियुकने या स्पर्धेत एकही सामना गमवला नाही. तिने पहिल्या सहा फेऱयांत सहा विजय मिळविले. स्पर्धेत तिने 7 विजय, चार सामने अनिर्णीत राखत 11 फेऱयांत 9 गुण घेतले.
खुल्या विभागात मित्रभा गुहाने 8.5 गुणांसह 15 वे स्थान मिळविले तर विदित गुजरातीने 7.5 गुणांसह 45 वे व हरिष भारतकोटीने 7 गुणांसह 60 वे स्थान मिळविले. अनुभवी पी. हरिकृष्णला केवळ 6.5 गुण मिळविता आले आणि त्याला 99 वे स्थान मिळाले. 17 वर्षीय अब्दुसत्तोरोव्हने जागतिक अग्रमानांकित मॅग्नस कार्लसनचे वर्चस्व झुगारून टाकले असून त्याने टायब्रेकमध्ये इयान नेपोम्नियाचीला हरविले. अब्दुसत्तोरोव्ह, नेपोम्नियाची, कार्लसन व फॅबिआनो कारुआना यांचे प्रत्येकी 9.5 गुण झाल्याने टाय झाले होते. त्यामुळे अब्दुसत्तोरोव्ह व नेपोम्नियाची यांच्यात टायब्रेक लढत झाली.









