पुसेगाव / वार्ताहर :
आवारवाडी (विसापूर) ता. खटावच्या महिला ग्रामपंचायत सदस्या व त्यांच्या कुटुंबाने अंदाजे 700 फूट केबल उघड्यावर तर काही ठिकाणी मातीत पुरून गेले आठ महिने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची वीज चोरी केली आहे. वीज कंपनीचे अधिकारी व वायरमन यांच्या समक्ष वीज चोरी व वीज कंपनीची फसवणूक उघड झाली आहे. गावातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होईल,असे वर्तन केल्याने सदर व्यक्तीचे ग्रा. सदस्य पद रद्द करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शोभा हणमंत कदम या शेतकरी महिलेने जिल्हाधिकारी, पंचायत समिती कडे केली आहे.
विसापूर नजीकच्या आवारवाडीत महिला ग्रामपंचायत सदस्या प्रियांका तुकाराम कदम यांनी पदाचा व बळाचा वापर करून आठ-दहा महिन्यांपूर्वी बांधलेल्या नविन घरात विजेची सोय व्हावी, म्हणून एका पोल्ट्री मधून सुमारे 700 फूट केबल कुठे शेताच्या बांधावर, वाहतुकीच्या रस्त्यालगत, शेतातील मातीत पुरून, महावितरणची वीज चोरी केली आहे. दरम्यान या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना व या रस्त्यावरून जाणाऱ्या इतर लोकांच्या जीविताला जाणूनबुजून धोका निर्माण केला जात आहे. त्यामुळे या सदस्याची योग्य अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून सदर सदस्याचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी शोभा हणमंत कदम यांनी केली आहे.
दरम्यान, खटाव सब डिव्हिजनचे शैलेश राक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी पुसेगाव वीज वितरण कार्यालयाचे अभियंता मेनकुदळे ,लाइनमन व वायरमन यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता वीज चोरीचा प्रकार उघड झाला. पुसेगाव वीज वितरण कंपनीच्या वतीने स्पॉट व्हेरिफिकेशनचा रिपोर्ट सब डिव्हिजन ला देण्यात येणार आहे. त्यानंतर दोषींवर कारवाई होईल असे अभियंता मेनकुदळे यांनी सांगितले.