वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
भारतीय महिला कुस्तीचे प्रशिक्षक अँड्रय़ू कूक यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय भारतीय कुस्ती फेडरेशनने घेतला आहे. साईने लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन मार्गदर्शनाची सुविधा सुरू केली होती. पण वेतन न दिल्याने त्यात सहभागी होण्यास अमेरिकेच्या कूक यांनी नकार दिला होता. त्यामुळे त्यांना सेवामुक्त करण्याचा निर्णय फेडरेशनने घेतला आहे.

कोव्हिड 19 च्या प्रकोपामुळे गेल्या मार्चमध्ये महिला मल्लांसाठी लखनौमध्ये आयोजित केलेले राष्ट्रीय शिबिर रद्द केल्यानंतर कूक सीटलला रवाना झाले होते. डब्ल्यूएफआयने दिलेल्या माहितीनुसार, कूक यांच्याशी साईने अलीकडे संपर्क साधून त्यांना ई पाठशाला या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रात भाग घेण्याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी थकित वेतन मिळाल्याशिवाय या सत्रात भाग घेणार नसल्याचे स्पष्ट केले. 17 मार्च रोजी त्यांनी सीटलला प्रयाण केले त्यावेळी साईने आपला निम्मा पगार रोखला होता, असे त्यांनी सांगितले. ‘अशी वर्तणूक कोणालाही मान्य होणार नाही. ते फक्त वेतनासाठी काम करतात आणि भारतीय कुस्तीबद्दल त्यांना अजिबात आस्था वाटत नाही, हेच त्यातून स्पष्ट होते. त्यांनी नकार दिलेल्या संदेशांचे स्क्रीनशॉट्स साईच्या अधिकाऱयांनी आम्हाला दाखविले आहेत,’ असे डब्ल्यूएफआयचे साहायक सचिव विनोद तोमर यांनी सांगितले.
‘त्यानंतर आम्ही त्यांना उर्वरित वेतन देण्याचे मान्य करून मार्गदर्शन सत्रात भाग घेण्याची सूचना केली. त्यांनी काही सत्रात भागही घेतला. पण त्यांचे एकंदर वर्तन आम्हाला पसंत पडले नाही. आम्ही आपापसात व महिला मल्लांशी चर्चा केल्यानंतर त्यांना सेवामुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र त्यांना लवकरच पाठविण्यात येणार आहे,’ असेही तोमर यांनी सांगितले.









