वृत्तसंस्था/ कॅनबेरा
यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघातील रविवारी येथे ऍशेस मालिकेतील एकमेव कसोटी सामना थरारक स्थितीत अनिर्णीत राहिला. ऑस्ट्रेलिया संघाला या कसोटीत इंग्लंडचा पराभव करण्यासाठी शेवटचा गडी बाद करता आला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संभाव्य विजय थोडक्यात हुकला.
या एकमेव कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 9 बाद 337 धावांवर घोषित केल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 297 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात इंग्लंडवर 40 धावांची आघाडी मिळविली. ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 7 बाद 216 धावांवर घोषित करून इंग्लंडला 48 षटकांत विजयासाठी 257 धावांचे आव्हान दिले. इंग्लंडने 48 षटकांत 9 बाद 245 धावापर्यंत मजल मारल्याने ही कसोटी थरारकरित्या अनिर्णीत राहिली. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी इंग्लंडचा शेवटचा गडी बाद करता आला नाही तर इंग्लंडला विजयासाठी 12 धावा कमी पडल्या.
ऑस्ट्रेलियाने रविवारी 2 बाद 12 या धावसंख्येवरून चौथ्या आणि शेवटच्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. ऑस्ट्रेलियाच्या पेरी आणि मुनी यांनी 91 धावांची भागिदारी केली. मुनीने 63 धावा झळकविल्या. इंग्लंडच्या इक्लेस्टोनने पेरीला 41 धावांवर बाद केले. त्यानंतर इंग्लंडच्या डिनने मुनीचा बळी घेतला. ब्रंटने लेनिंगला 12 धावांवर बाद केले. ऑस्ट्रेलियाने 45 षटकांत 7 बाद 130 धावा जमवित इंग्लंडवर 170 धावांची आघाडी घेतली होती. मॅकग्रा आणि गार्डनर यांनी सहाव्या गडय़ासाठी 48 धावांची भागिदारी केल्याने ऑस्ट्रेलियाने 200 धावांचा टप्पा ओलांडला. गार्डनर 38 धावांवर तर मॅकग्रा 34 धावांवर बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 7 बाद 216 धावांवर घोषित करून इंग्लंडला विजयासाठी 257 धावांचे आव्हान दिले.
इंग्लंडच्या दुसऱया डावात हिल आणि ब्युमाँट यांनी पहिल्या गडय़ासाठी 52 धावांची भागिदारी केली. ब्युमाँटने 36 धावा जमविल्या. हिलने दुसऱया गडय़ासाठी 42 धावांची भर घातल्यानंतर ती 33 धावांवर बाद झाली. इंग्लंडने यावेळी 2 बाद 94 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर नाईट आणि स्कीव्हेर यांनी तिसऱया गडय़ासाठी 72 धावांची भागिदारी केल्याने इंग्लंडला शेवटच्या 17 षटकांत विजयासाठी 104 धावांची जरूरी होती. ऑस्ट्रेलियाच्या ब्राऊनने नाईटला 48 धावांवर बाद केले. स्कीव्हेरने 58 तर डंकलेने 45 धावा जमविल्या. 46 षटकाअखेर इंग्लंडने 9 बाद 244 धावांपर्यंत मजल मारली होती. क्रॉस आणि इक्लेस्टोन या शेवटच्या जोडीने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून हा सामना अनिर्णीत राखला.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया प. डाव 9 बाद 337 डाव घोषित, इंग्लंड प. डाव- सर्वबाद 297, ऑस्ट्रेलिया दु. डाव 7 बाद 216 डाव घोषित (मुनी 63, पेरी 41, ब्रंट 3-24), इंग्लंड दु. डाव- 9 बाद 245 (स्कीव्हेर 58, नाईट 48, डंकले 45, हिल 33, सुदरलँड 3-69).









