प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊनपूर्वी व लॉकडाऊननंतर पेट्रोल व डिझेलच्या दरातील तफावत पाहता ती 10 रुपयांपर्यंत पोहोचली होती. 10 रुपयांनी पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने वाहनचालकांना याचा फटका सहन करावा लागत होता. परंतु मागील महिनाभरात डिझेल 3 रुपयांनी तर पेट्रोलचा दर 1 रुपयाने कमी झाला आहे. पेट्रोल व डिझेलचे दर अजून कमी व्हावेत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
मार्च महिन्यात पेट्रोलचा दर 73 रुपये 57 पैसे होता. डिझेलचा दर 66 रुपये 02 पैसे इतका होता. परंतु जून महिन्याच्या प्रारंभापासून या दरांमध्ये हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली. जून महिनाअखेर पेट्रोलचा दर 83 रुपये 08 पैसे तर डिझेलचा दर 77 रुपये 92 पैशांवर पोहोचला. कोरोनामुळे देशासमोर उभे राहिलेले आर्थिक संकट भरून काढण्यासाठी पेट्रोलवरील कर वाढविण्यात आल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
इंधन दरात झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य भरडले जाऊ लागले आहेत. आधीच व्यवसाय नाहीत. अनेकांना नोकरीवरून कमी केले गेले आहे. अशा परिस्थितीत वाढलेल्या पेट्रोल व डिझेलच्या दरामुळे आर्थिक गणित सांभाळणे कठीण झाले आहे. डिझेल दरात झालेल्या वाढीमुळे वाहतूक खर्च वाढविण्यात आला आहे. यामुळेच सर्वच अन्नपदार्थांचे दर वाढले आहेत. सध्या हे दर काही प्रमाणात कमी करण्यात आले असले तरी ते लॉकडाऊन पूर्वीच्या दराप्रमाणे आकारले जावेत, अशी मागणी होत आहे.
सप्टेंबरपासून किमती कमी
प्रशांत मेलगे (सदस्य, बेळगाव पेट्रोल डिलर्स असोसिएशन)
लॉकडाऊनच्या काळात पेट्रोलच्या किमती वाढविण्यात आल्या होत्या. परंतु सप्टेंबर महिन्यात किमती कमी केल्या गेल्या. सध्या डिझेल 3 रुपयांनी तर पेट्रोल 1 रुपयांनी कमी करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.