इंजिनमधील बिघाडामुळे निर्णय – नाशिक प्रकल्पातील वाहनांचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील प्रमुख वाहन उत्पादन कंपनी महिंद्राने जवळपास 600 गाडय़ा परत मागवण्याचे ठरवले आहे. सदरच्या गाडय़ांच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याच्या कारणास्तव कंपनीने हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. या वाहनांची कंपनीने नाशिक येथील प्रकल्पामध्ये 21 जून ते 2 जुलै 2021 या दरम्यान निर्मिती केली आहे. कंपनीला पहिल्या डिझेल मॉडेलमध्ये बिघाड असल्याचे आढळून आले होते. कंपनी सदरच्या कार्समधील डिझेल इंजिनच्या मॉडेलची तपासणी करुन त्यामध्ये आवश्यक तो बदल करणार असल्याचे म्हटले आहे. खराब फ्यूलच्या कारणास्तव इंजिन कमी कालावधीत खराब झाल्याचे कंपनीला दिसून आले आहे.
मोफत होणार दुरुस्ती
महिंद्राने म्हटले आहे, की बिघाड झालेल्या गाडय़ा दुरुस्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. यामुळे कंपनी या प्रकारच्या बिघाड झालेल्या गाडय़ा ज्यांच्याजवळ आहेत, त्यांच्याशी संपर्क करुन त्या ग्राहकांना याबाबतची माहिती देणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.









