पंचगंगा नदी घाटावरील भाजी विक्रेत्यांना आयुक्तांनी केले मार्गदर्शन
प्रतिनिधी / कोल्हापूर
महास्वच्छता अभियानाच्या 74व्या रविवारी स्वच्छता मोहीमे दरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात आली. पंचगंगा नदी घाट परिसरातील भाजी विपेत्यांना आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी मार्गदर्शन केले. तर यावेळी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱया विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मोहिमेतंर्गत शहरातील विविध भागातून तीन टन कचरा व प्लॅस्टीक उठाव करण्यात आला.
शहरातील पंचगंगा नदी घाट, रंकाळा तलाव परिसरातील पत्तोडी घाट ते अंबाई टँक मुख्यरस्ता, हुतात्मा पार्क, रिलायन्स मॉल मागील बाजू, इंदिरा सागर हॉल ते आयाशोलेशन हॉस्पीटल, खानविलकर पेट्रोल पंप ते भगवा चौक, जयंती नदी पंपीग स्टेशन आदी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 3 जेसीबी, 7 डंपर, 6 आरसी गाडया, 2 औषध फवारणी टँकर, 1 पाणी टँकर आणि 100 स्वच्छता कर्मचाऱयांच्या सहाय्याने मोहिम राबविण्यात आली.
मोहीमेत उपआयुक्त निखिल मोरे, सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे, संदीप घारगे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शाखा अभियंता आर.के.पाटील, रामचंद्र काटकर, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरिक्षक राहूल राजगोळकर आदी उपस्थित होते.
शहर स्वच्छतेसाठी आम्ही कटीबद्ध
रंकाळा तलाव परिसरातील पत्तोडी घाट येथे महापालिका अधिकारी कर्मचाऱयांबरोबरच स्थानिक नागरिकांनीही हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. यापुढील काळातही शहराच्या स्वच्छतेसाठी आम्ही कटिबध्द राहू,अशी ग्वाही यावेळी नागरिकांनी दिली. स्वच्छता मोहिमेनंतर पतोडी घाट परिसर चकाचक झाला.
वृक्षप्रेमी वेल्फेअरकडुन वृक्षारोपण
वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशनतर्फे छत्रपती राजाराम उद्यान टाकाळा, शाहू रोड बागल चौक येथे ब्रम्हा दंड टेंभुर्णी, करमाळा, कुंकू फळ, कडुलिंब, पायर, औदुंबर, कदंब, जांभूळ, हेळा, बिटी, पिंपळ, मोर आवळा, करंज, बेल अशा दुर्मीळ औषधी वनस्पतीचे वृक्षारोपण करत परिसराची स्वच्छता करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्डे, सतीश कोरडे, अक्षय कांबळे, स्वप्निल खाडे, सचिन पोवार, भालचंद्र गोखले, तात्या गोवावाला, शैलेश टिकार, सौरभ कापडी, तेजस कांबळे, प्रवीण मगदूम, श्रवण बुड्डे आदी उपस्थित होते.
झूम प्रकल्पस्थळीही वृक्षारोपण
स्वरा फौंडेशनतर्फे कसबा बावडा झूम प्रकल्प येथे ग्रीन कॉरिडॉर करण्याच्या दृष्टीने विषारी वायू शोषण करणाऱया झाडांचे वृक्षारोपण आरोग्यधिकारी डॉ.अशोक पोळ, तानाजी पाडळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फौंडेशनचे अजिंक्य पाटील, प्रमोद माजगावकर, सन्मेश कांबळे, अमर कुंभार, स्वप्निल कुंभार, शुभम पाटील, सुशांत शेवाळे, विभागीय आरोग्य निरिक्षक निखील पाडळकर उपस्थित होते.