प्रतिनिधी / पणजी
राज्यात आज महाशिवरात्रौत्सव मोठय़ा भक्तीभावात साजरा होणार आहे. राज्यातील शिवमंदिर असलेल्या प्रत्येक गावात दिवसभर मोठा उत्सव होणार असून ’हर हर महादेव’ च्या जयघोषात वातावरण भक्तीमय होणार आहे. वर्षभरात येणाऱया बारा शिवरात्रीपैकी फेब्रुवारी-मार्च महिन्यात येणाऱया महाशिवरात्रीला फार मोठे आध्यात्मिक महत्व आहे.
राज्यातील हरवळे रुद्रेश्वर देवस्थान, नार्वे सप्तकोटेश्वर आणि महादेव मंदिर तांबडी सुर्ल येथील शिवमंदिरे तीर्थस्थळांसाठी प्रसिद्ध आहेत. आज तेथे तीर्थस्नानासाठी भाविकांची गर्दी उसळणार आहे. त्यानंतर बेल व दूध अर्पण करून भाविकांना स्वहस्ते शिवलिंगाची पूजा करण्याची संधी मिळते. त्याशिवाय मंगेशी, नागेशी, शिवनाथी शिरोडा, ताळगाव, भाटले, ओल्ड गोवा, कंदब पठार, सावळे-पिळर्ण येथेही श्रीशंकराची मंदिरे आहेत. तसेच अन्य अनेक गावात लहानमोठी शिवमंदिरे आहेत. या प्रत्येक मंदिरात आज शिवभक्तांना स्वहस्ते अभिषेक करण्याची संधी मिळते.
महाशिवरात्रीत शिवशंकराला प्रिय असणाऱया जल, दूध, बिल्वपत्र, भांग, कापूर, धतूरा, आंकडा, कापूर, अक्षदा, चंदन यासारख्या वस्तू मनोभावे अर्पण करण्यात येतात. महाशिवरात्री दिवशी अनेक भक्त उपवासही करतात. दिवसभर ॐ नमः शिवाय चा जप करतात. त्याद्वारे श्रीभोलेनाथ प्रसन्न होऊन मनातील इच्छा पूर्ण करतात अशी श्रद्धा आहे.









